Pune District : शेतकऱ्यांनी एस.आर.टी.पद्धतीने शेती करावी

– तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे यांचे बांधावरच आवाहन
वीसगाव खोरे – एस.आर.टी. पद्धतीत वापरलेल्या गादीवाफ्यामुळे भात रोपांच्या मुळाशी प्राणवायूचे सुयोग्य प्रमाण तसेच पुरेसा वाफसा राहतो. साच्यामुळे दोन रोपांमधील नेमके आणि सुयोग्य अंतर राहते परिणामी रोग व किडींचा त्रास कमी होतो तसेच विपुल प्रमाणात अपोआप गांडूळ वाढतात त्यामुळे शेतकऱ्यांनी एस.आर.टी.पद्धतीने शेती करावी, असे आवाहन तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे यांनी शेतकऱ्यांना केले. बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे संजय काचोळे, प्रकल्प संचालक आत्मा पुणे सुरज मडके, तालुका कृषि अधिकारी भोर शरद धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यात खरीप हंगाम मार्गदर्शन मोहीम राबविली जात असून खरीप हंगाम मार्गदर्शन मोहिमेंतर्गत पिसावरे (ता.भोर) येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत एस.आर.टी.पद्धतीचा वापर करून भाताचे उत्पादन घेण्याची प्रात्याक्षिके दाखविण्यात आले.
तालुका कृषि अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी एस.आर.टी.हे शून्य मशागत शेती तंत्रज्ञान असून भात शेतीशी संबंधित नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायम स्वरूपी गादीवाफ्यावर टोकणणी करून भरघोस भात पिकाविण्याचे तंत्र आहे. शेतकऱ्यांचा मशागत खर्च कमी,बियाणे व खतांची बचत होते, मजूर कमी यामुळे मजुरीची बचत होते व उत्पादनात वाढ होते तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
सहाय्यक कृषी अधिकारी प्रशिका निकाळजे यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी फळबाग व बांबू लागवडीसाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी तालुका कृषि अधिकारी शरद धर्माधिकारी, तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, सहाय्यक कृषि अधिकारी प्रशिका निकाळजे, एस.आर.टी.मार्गदर्शक उज्वला बांदल, विजय बांदल, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्लाॅटवरच मार्गदर्शन…
एस.आर.टी. मार्गदर्शक विजय बांदल यांनी शेतकऱ्यांना गादीवाफा कसा करायचा व त्यावर टोकणणी यंत्रच्या सहाय्याने पेरणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी भात पिकाची लागवड केलेल्या प्लॉटवर जाऊन शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.





