पुणे जिल्हा : शेतकर्यांनो सातबाराला पीकपाणीची नोंद करा

इंदापूरचे नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांचे आवाहन
पळसदेव – शेतकर्यांनो आपल्या जमिनीच्या सातबाराला पीक पाणीची नोंद करा, अन्यथा आपला पुढील काळात शासनाच्या व बँकेच्या विविध योजनांपासून वंचित राहू शकता. त्यामुळे तातडीने आपल्या सातबाराला शेतकर्यांनी स्वतःच पिकपाणीची नोंद करावी असे आवाहन इंदापूरचे नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांनी केलं आहे.
डोईफोडे पुढे म्हणाले, सातबाराच्या पीक पाणी करण्याची मुदत 23 सप्टेंबर संपली होती. त्यावेळी इंदापूर तालुक्यातील सुमारे साठ ते सत्तर टक्के शेतकर्यांची सातबाराच्या पीकपाणी नोंद करण्याची बाकी होती. जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती होती. त्यामुळे सातबाराला पीकपाणी करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती.
त्यानुसार तहसीलदार जीवन बनसुडे यांनी याबाबत शासनाला कळवले होते. त्यानुसार आता पुन्हा ई पीक पाणी अॅपच्या द्वारे नोंदणी सुरु करण्यात आली असल्याची माहिती अविनाश डोईफोडे यांनी दिली. शेतकर्यांनी ई पीक पाणी अॅपच्या माध्यमातून स्वतः शेतात जाऊन स्वतः पीक पाणी नोंद करावी. नोंदणी करताना काही अडचाणी असल्यास गावातील तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, कृषी सहायक यांची मदत घेण्याचे आवाहनही या वेळी डोईफोडे त्यांनी केले.
बँकेतून कर्ज काढण्यासाठी, किंवा नूतनीकरण करण्यासाठी, किंवा कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील सातबारा ला पिकपाण्याची नोंद असणे आवश्यक आहे. मागील दुष्काळ मदत निधी वाटपात देखील अनेक शेतकरी पीक पाणी अभावी वंचित राहिले होते. त्यामुळे अनेक शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले होते.
शेतकर्यांनी सातबाराला स्वतःच पीक पाणीची नोंद करावी. अधिक प्रमाणात पीकपाणी नोंद होण्यासाठी गाव व वाड्या वस्त्यांवर पीकपाणी नोंदणीचे कॅम्पच्या आयोजन देखील करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीना महसूल प्रशासनाच्या वतीने या वेळी करण्यात आले.





