पुणे जिल्हा : बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

वडनेर खुर्दमध्ये घटना : बेट परिसर बिथरला
जांबूत/ सविंदणे/ टाकळी हाजी – वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथे (दि.6) शेतमजूर म्हणून कामासाठी आलेले हरिश्चंद्र बारकू वाघमारे (वय 62) यांच्यावर पहाटे दोनच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून जखमी केले. माहिती समजताच वनविभागाचे कर्मचारी वनपाल गणेश पवार, सविता चव्हाण व एच. एस. पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. जखमींना पुढील उपचारासाठी दखल केले आहे.
शेतमजूर कुटुंब हे झोपडीत राहत असून गेली अनेक दिवस परिसरात ते वास्तव्यास आहेत. पहाटे दोनच्या सुमारास आपल्या झोपडीत झोपले असताना बिबट्याने त्यांच्या पायावर झडप घालून त्यांना जखमी केले. मात्र, प्रसंगावधान राखल्याने ते थोडक्यात बचावले. मागील आठवड्यात जांबूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला होता. पिंपरखेड येथे शेतमजूरावर हल्ला करून जखमी केले होते. बिबट्यांची संख्या वाढल्याने शेतकरी, विद्यार्थी भयभीत झाले आहेत. हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी पिंजरे लावले आहेत. पिंपरखेड येथे बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. तरीही इतर ठिकाणी पिंजरे प्रतीक्षेत आहेत.
बेट भागातील पिंपरखेड, जांबूत, काठापूर खुर्द, चांडोह, फाकटे, शरदवाडी, वडनेर खुर्द गावांमध्ये बिबट्यांची संख्या मोठी आहे. अनेक हल्ले यामागील काही दिवसात झालेले आहेत. दिवसा बिबट्यांचा संचार वाढला असून तीन ते चारच्या संख्येने बिबटे संचार करू लागल्याने कामावर येणारे शेतमजूर, शेतकरी, शालेय विद्यार्थी भयभीत झालेले आहेत. बिबट्यांच्या कायमचा बंदोबस्त कसा करता येईल, याबाबत ठोस भूमिका वनविभागाने घ्यावी.
– विक्रम निचित, उपसरपंच, वडनेर खुर्द.
प्रथमोपचारानंतर ससूनला हलवले
टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका घुगे म्हणाले की, वनपाल गणेश पवार, वनरक्षक सविता चव्हाण व ऋषिकेश लाड यांनी त्यांना टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्य पर्यवेक्षक डॉक्टर भरत सोदक यांनी दिली. रुग्णाच्या पायाला झालेली जखम 9 सेंटीमीटरची असून साधारणपणे आठ ते नऊ टाके पडतील. त्यामुळे प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.





