पुणे जिल्हा : बारामतीतूनच मिळणार निर्यातदारांना प्रमाणपत्र

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचा उपक्रम
बारामती – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने निर्यातदारांना लागणारे सर्टिफिकेट ऑफ ओरिजीनची सुविधा बारामतीमधून सुरू झाल्याची माहिती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर या संस्थेची शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू असून नुकतीच बारामतीमध्ये विभागीय कार्यालय सुरू केले असून त्याला 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र चेंबर्सच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम मराठी पाऊल पडते पुढे याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र चेंबर्सचे नुतन अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगांवे, उपाध्यक्ष दिलीप गुप्ता, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य म्हणून निवड झालेले शरद सूर्यवंशी, चंद्रकांत ठक्कर, डॉ. विजयकुमार मालापुरे, जगदीश पंजाबी, महेश ओसवाल यांचाही याप्रसंगी बारामती विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बारामती विभागाचे अध्यक्ष शरद सूर्यवंशी यांनी निर्यातदारांना लागणारे सर्टिफिकेट ऑफ ओरिजीन हे प्रमाणपत्र बारामतीच्या विभागीय कार्यालयामध्ये देण्यात यावे यासाठी सातत्याने चेंबर्सकडे पाठपुरावा केला होता याची दखल घेवून ललित गांधी यांनी या सुविधा 1 जुलै 2024 पासून बारामती विभागीय कार्यालयातून सुरू करीत असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य भारत फोर्ज, रिअल डेअरी, सोहन ग्रुप, हॉटेल सुर्या यांनी केले. या कार्यक्रमासाठी भारत फोर्जचे प्लान्ट हेड संजय आगरवाल, सदाशिव पाटील, अॅड. पी. टी. गांधी, मनोज तुपे, सुरेश पकराळे, विलास आडके, साईनाथ चौधर, भारत जाधव, विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.स्वागत बारामती विभागाचे उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर यांनी तर बारामती विभागाचे उपाध्यक्ष सुशिलकुमार सोमाणी यांनी अभार मानले.
या ठिकाणी मिळणार प्रमाणपत्र
सर्टिफिकेट ऑफ ओरिजीनची सुविधा चेंबरचे विभागीय कार्यालय हॉटेल सूर्याचा पहिला मजला, भिगवण रस्ता, बारामती येथून देण्यात येईल. तरी बारामती विभागातील निर्यातदार उद्योजकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.





