Pune District: रानभाजीचा प्रयोग आमच्या जगण्याचा आधार

चिंबळी: डोंगराळ भागात येणार्या कर्टुले रानभाजीचा प्रयोग आमच्या शेतात करणे हे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. मात्र आम्ही त्यावर अभ्यास करत त्याचे उत्पादन घेतले. आज हीच पालेभाजी आम्हाला लाखो रुपयांचा नफा मिळून देते. रानभाजीचा हाच प्रयोग आमच्या जगण्याला आधार ठरला आहे, असे मत प्रयोगशील महिला शेतकरी सीमा चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग खेड व प्रयोगशील महिला शेतकरी सिमाताई जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने चिंबळी येथे एक दिवसीय सेंद्रिय शेती कार्यशाळा औषधी गुणधर्म असलेली रानभाजी कर्टुले लागवड या विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात जाधव यांनी रानभाजी उत्पादन व विक्री संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत अमृत संजीवनी फार्मर प्रोड्युसर कंपनी, चिंबळी, भुजबळ अॅग्रो प्रोडूसर कंपनी, शिरोली, महाराष्ट्र महाबीज मंडळ, पुणे, शाश्वत कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी पुणे यांनी सहभागी घेतला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलास कातोरे, सरपंच ज्योती जैद, माजी सरपंच मच्छिंद्र भुजबळ, मृदाशास्त्रज्ञ योगेश यादव,
ग्रामपंचायत सदस्या ज्योती जाधव,सोसायटी संचालक आप्पासाहेब बटवाल, महाराष्ट्र बियाणे महामंडळाचे पुरुषोत्तम काटे, निवृत्त कृषी अधिकारी ताराचंद परदेशी, डॉ. महामुनी, चंद्रकांत जाधव, मधुमक्षिका पालक शास्त्रज्ञ हेमंत कुमार डुबरे, अनिल बनकर, सुलभा चीपाडे, पुष्पा चोरामले, मंगेश पावसे, संतोष सरवदे, आर्मी रिटायर शेतकरी पुष्पक केळकर, रामकिसन गुंड, विशाल पुणेकर, सॅम फ्रँकलिन, अमोल पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
गटशेतीतून समृद्धी साधा, सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून येत्या काळात शाश्वत आणि सेंद्रिय उत्पादनांनाच मागणी असणार आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकर्यांनी शेतीत नवे प्रयोग राबवावे.जाधव यांचा प्रयोग शेतकर्यांसाठी रोल मॉडेल आहे.
– सतीश शिरसाठ, उपविभागीय कृषी अधिकारी





