पुणे जिल्हा : शिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लवकरच विस्तारीकरण

शवविच्छेदन केंद्र सुरू करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांचे आश्वासन
खेड शिवापूर – शिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे विस्तारीकरण करून शवविच्छेदन केंद्र सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी जिल्हाप्रमुख रमेश कोंडे व उपस्थित पदाधिकाऱ्यांना खेड शिवापूर येथे शुक्रवार, दि. ३ रोजी दिले.
आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या वाहनांचा ताफा पुणे सातारा रस्त्यावरून जात असताना खेड शिवापूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील त्रुटी सांगण्यासाठी थांबविले होते. यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले. या प्रसंगी जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शिवसेना नेते कुलदीप कोंडे, भोरचे माजी उपसभापती अमोल पांगारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. विजय काळे, सरपंच अमोल कोंडे, अण्णा दिघे, राकेश गाडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सोमेश्वर कोंडे, अशोक बांदल, तसेच सतीश घाटे, जगदीश धुमाळ, राजू सट्टे, सुनील नावडकर, व राजू सनस आदी उपस्थित होते.
कोंडे यांनी सांगितले की, खेड शिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील रुग्णांची संख्या ही जवळपास दोन लाखाच्या आसपास आहे. मात्र, त्या संख्येची तुलना केली तर आताचे आरोग्य केंद्र हे कमी पडत आहे. परिणामी येथे रुग्णांची संख्या जास्त व इतर त्रुटी यांची कमतरता भासत आहे.
तसेच पुणे सातारा रस्त्यावर होणारे अपघात व त्यामध्ये होणारे मृत्यूचे शवविच्छेदन करण्यासाठी भोर किंवा पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे जावे लागते. भौगोलिकदृष्ट्या याचा विचार केला, तर मृतदेह पुन्हा आणण्यासाठी २४ तासांचा अवधी लागतो. त्यामुळे खेड शिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन सुविधा उभारावी, अशी मागणी मंत्री अबिटकर यांच्याकडे केली.





