पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या तीन ते चार महिन्यात होणार आहे. या निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसार प्रभागांची रचना केली जाणार आहे. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत शहराची लोकसंख्या वाढली असून ती ३० लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. मात्र, २०११ च्या जणगणनेनुसारच प्रभागांची रचना केली जाणार असल्याने लोकसंख्या वाढली असली तरी नगरसेवकांची संख्या मात्र तेवढीच राहणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थापना ११ ऑक्टोबर १९८२ ला झाली. त्यानंतर २६ मार्च १९८६ पर्यंत पालिकेवर प्रशासक होते. २ मार्च १९८६ साली ६० वॉर्डसाठी पालिकेची निवडणूक झाली. त्यानंतर १९९२ व ९७ ला एक वॉर्ड याप्रमाणे निवडणूक झाली. फेब्रुवारी २००२ मध्ये ३ सदस्यीय पद्धतीने निवडणुका झाल्या यावेळी ३५ प्रभाग होते. त्यानंतर दोन व चार सदस्य पद्धतीने निवडणुका झाल्या. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २०२१ ची जनगणना झाली नाही. सन २०११ साली शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ३५९ होती. त्यामध्ये पुरुष ९ लाख ४५ हजार ९४३ व महिलांची संख्या ७ लाख ८३ हजार ४०६ होती. गेल्या पंधरा वर्षात ही लोकसंख्या सुमारे १५ लाखांने वाढून ३२ लाखांच्या जवळ गेली आहे. करोनामुळे २०२१ ची जनगणना झाली नाही, त्यामुळे २०११ च्या जनगणनेनुसारच प्रभागांची रचना करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रभागाची संख्या ३२ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १२८ राहणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पालिका आयुक्त सादर करतील. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकार्यांवर असणार आहे. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना आयुक्त प्रसिध्द करतील. त्यावर येणाऱ्या हरकती व सुचनावर राज्य सरकारने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोग मान्यता देईल व त्यानंतर महापालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करतील. महापालिकेच्या झालेल्या निवडणुका वर्ष- सदस्य पद्धत- प्रभाग मार्च १९८६- एक सदस्य- ६० फेब्रुवारी १९९२- एक सदस्य- ७८ फेब्रुवारी १९९७- एक सदस्य- ७९ फेब्रुवारी २००२- तीन सदस्य- ३५ फेब्रुवारी २००७- एक सदस्य- १०५ फेब्रुवारी २०१२ – दोन सदस्य- ६४ फेब्रुवारी २०१७- चार सदस्य- ३२ प्रभाग रचना करण्याबाबत राज्य सरकारचे आदेश प्राप्त झाले आहेत. चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यासंदर्भात आदेश आहेत. किती दिवसात पूर्ण करायची याबाबत आदेश नाही. मात्र, तीन महिन्यामध्ये प्रभागरचना पूर्ण करण्यात येईल. – अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग.