Pune District : वाल्ह्यात जर्मन तंबूची उभारणी

वारकऱ्यांसाठी आरामदायी मुक्काम
वाल्हे – आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्यातील पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असलेल्या, तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पुणे जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत असलेल्या,वाल्हे (ता. पुरंदर) नजिक सुकलवाडी फाट्याशेजारी प्रांगणामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत्या २५ जून रोजी विसावणार आहे. दरम्यान, पावसाचा फटका टाळण्यासाठी आणि वारकऱ्यांना सुरक्षित व आरामदायी मुक्काम मिळावा म्हणून वाल्हे येथे ५० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे जर्मन तंबू उभारण्यात येत आहे.
सध्या पावसाचे प्रमाण बघता वारकऱ्यांसाठी ५० हजार स्केअर फुटचे जर्मन हँगर अर्थात वारकरी सेवा केंद्र उभारण्यात येत आहे. तंबूंमध्ये मजबूत लोखंडी फ्रेम्स, पावसापासून संरक्षण करणाऱ्या प्लॅस्टिक शीट्स, प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, चटई-उशा, तसेच मोबाइल चार्जिग पॉइंट अशी सुविधा दिली आहे. जर्मन तंबूची लांबी २५० फूट, रुंदी १०० फूट आणि उंची ३० फूट आहे.
एकाच वेळी हजारो वारकरी मुक्काम करू शकतात. ही संपूर्ण व्यवस्था पुणे जिल्हा परिषद, स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, सामाजिक संस्थांच्या संयुक्त सहभागातून उभारली आहे. यंदा पावसामुळे होणाऱ्या अडचणी कमी होतील, असा विश्वास सरपंच अतुल गायकवाड यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
एलईडीची राहणार सोय
पालखी मार्गावर वाल्हे या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला आहे. सर्व ठिकाणी एलईडी बसविण्यात येणार आहेत. एलईडीद्वारे भजन, कीर्तन, भक्तिगीते लावण्यात येणार आहेत. वारीविषयी सर्व सोयी-सुविधांची जनजागृती एलईडीतून केली जाणार आहे, अशी माहिती सरपंच अतुल गायकवाड यांनी दिली.





