पुणे जिल्हा: शिरूर तालुक्यातील तलाठ्यांकडून अजूनही नोंदी प्रलंबित

शिरूर – तालुक्यातील अनेक तलाठ्यांकडे १५५ दुरुस्ती, जमिन बिगरशेती केल्याच्या नोंदी, खरेदी खताच्या, बॅंकेचा बोजा चढवण्याच्या नोंदी गेल्या तीन महिन्यापासून प्रलंबित असल्याने अशा तलाठ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
कोरेगाव भिमा येथील तलाठी तहसिलदारांनी दिलेल्या जमिन बिगरशेती आदेशाची तीन महिने उलटून गेले तरी नोंद करत नाही. पैसे दिल्याशिवाय कोणत्याच नोंदी करत नाही, असा आरोप लक्ष्मण गव्हाणे यांनी केला आहे. वारंवार फोन करूनही कुठल्याच नोंदी केल्या जात नाही. तशीच परिस्थिती सणसवाडी येथील तलाठ्याची आहे. या हायवेच्या कडेला असणाऱ्या मग्रुर तलाठयांची तातडीने चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे.
तेथील मंडल अधिकारी काय करतात त्यांच्यावर ते नियंत्रण ठेवू शकत नाही का? उशिरा टाकणाऱ्या नोंदीचे व पाठीमागून लगेच केल्या जाणाऱ्या नोंदी पाठीमागचे नक्की गौडबंगाल काय आहे? हे समजायला शिरूर तालुक्याची जनता खुळी नाही. ‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय नागरीकांना येत असून आता नागरीकांचा संयम सुटत चालला असून सामाजिक कार्यकर्ते आता याबाबत मैदानात उतरून दोषी तलाठी, मंडल आधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन करणार आहेत.
‘तलाठी मंडल आधिकारी जोमात नागरिकक कोमात’ अशी अवस्था शिरुर तालुक्याची झाली आहे. तालुक्यात नवीन आलेले बरेच मंडल आधिकारी, तलाठी वरिष्ठांचा प्रोटोकॉल पाळून आवडीच्या सजाच्या ठिकाणी आले आहेत. बऱ्याच सजाच्या ठिकाणी झिरो पंटर काम चालवत आहे. संगणमताने ते नोंदी साठी नागरिकांची अडवणुक करून त्यांना लुटत आहेत.





