Pune District : राजगुरूनगरात अतिक्रमणे जमीनदोस्त

राजगुरूनगर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने झालेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम जोरदारपणे सुरू आहे. महामार्गालगत केलेली अतिक्रमणे हटवण्यात येत असल्याने अनेकांचे व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे ही कारवाई योग्य झाल्याने महामार्ग मोकळा झाला आहे.
शिरोली, चांडोली, राजगुरूनगर बाह्यवळण रस्ता, तुकाईवाडी पानमळा हद्दीत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांवर सोमवारी (दि. 11) अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई केली. तगड्या पोलीस बंदोबस्तात झालेल्या कारवाईत रस्त्यालगत नव्याने उभारण्यात आलेली पत्रा शेड, होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आली. अनेक व्यावसायिकांचे यामुळे नुकसान झाले. काहींनी तर कर्ज घेऊन नुकतीच शेड, होर्डिंग उभारली होती. या कारवाईने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरूनगर शहरात येणार्या बाह्यवळण रस्त्यावरील तुकाईवाडी जवळ जवळपास 15 पत्रा शेड करण्यात आलेली हॉटेल, दुकाने यावर जेसीबी यंत्राच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. पत्र्याची शेड उखडून टाकण्यात आली. राजगुरूनगर कारवाई सुरू असताना वरच्या भांबुरवाडीचे सरपंच विजय थिगळे, तुकाईवाडीचे माजी सरपंच काकासाहेब कोरडे व ग्रामस्थ व्यावसायिकांचे अधिकचे नुकसान होऊ नये म्हणून साहित्य बाजुला करून देण्यासाठी वेळ घेतला. अतिक्रमणे हटविल्याने रस्त्यावरील हॉटेल, दुकानांचे साहित्य भर उन्हात रस्त्यावर पडून होते.
आगाऊ सूचना दिली मात्र…
तुकाई वाडी परिसरात अनेक पत्रा शेड, होर्डिंग उभारली होती. त्यांना आगाऊ सूचना देण्यात येऊन स्वतःहून अतिक्रमण काढण्याची संधी दिली होती. मात्र थेट कारवाई पर्यंत स्वतःहून ती हटविण्यात आली नसल्याने अतिक्रमण पथकाने जेसीबी लावून सपाट केली. मोशी टोल नाका किंवा चिंबळी येथे कारवाईची सुरुवात झाली. पुढे पुढे कारवाई करण्यात येत आहे. चार किलोमीटरवर कारवाई होत असताना आणि माहिती दिली असताना ज्यांनी प्रतिसाद दिला नाही, अशा अतिक्रमणधारकांचे कारवाईमध्ये नुकसान झाले. त्याला प्रशासन जबाबदार नाही. असे अधिकार्यांनी सांगितले.
कोट्यवधी रुपयांचे नुकसान
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. महामार्ग परिसरात संपादन झालेल्या जमिनीवर अनेकांनी अतिक्रमणे केली होती. यात हॉटेल्स, टपर्या चहाची दुकाने भाजीपाला आणि होल्डिंग होते. दुकानांमध्ये अनेक परराज्यातील नागरिकांनी गुंतवणूक करून भाड्याने घेतली होती ज्यांची जागा गेली होती त्यांनी हम रस्त्याच्या कडेला दुकाने हॉटेल्स थाटली ती परराज्यातील नागरिकांना भाड्याने दिली होती त्यात त्यांचा व्यवसाय सुरू होता; मात्र अचानक धडक कारवाई झाल्याने त्यांनी भरलेला माल रस्त्यावर आला. त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. व्यसायानिमित्ताने आलेल्या या कुतुमानवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
राजगुरूनगर : पुणे-नाशिक महामार्गावर बाह्यवळण चौकात, तुकाई वाडी परिसरात सोमवारी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. त्यात शेड उखडुन टाकण्यात आलेल्या दुकानांचे साहित्य असे भर उन्हात रस्त्यावर पडले होते.





