Pune District : वृक्ष लागवडीमुळे होणारे अतिक्रमण थांबले

इंदापूर : इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या कार्यकाळात इंदापूर शहरातून जाणार्या जुन्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही रस्त्याच्या मधोमध असणार्या डिव्हायडरमध्ये, वृक्ष लागवड यशस्वी केली होती. नगरपरिषदेचे कर्मचारी सातत्याने या वृक्ष लागवडीची काळजी घेत असल्यामुळे, इंदापूर शहराला उभ्या असणार्या चांगल्या झाडांमुळे शोभा आलेली आहे.
इंदापूर शहरात राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सुविधा सहजगत्या सुलभतेने निर्माण होण्यासाठी, राज्य शासनाचा कोट्यवधी रकमेचा निधी या शहराच्या विकासासाठी आलेला आहे. यामध्ये रस्ते, गटारी तसेच विविध विकास कामे सुरू आहेत. शहरातील प्रत्येक रस्ता चकाचित होत असल्यामुळे नगरपालिकेने पूर्वी केलेले वृक्षारोपण शहराच्या वैभवात भर घालत आहे.
इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी नगर परिषदेत चार्ज घेतल्यापासून, अत्यंत बारकाईने शहराच्या लहान – मोठ्या विकास कामांवर, इंदापूर शहरातील प्रत्येक नागरिकांना विश्वासात घेऊन, नगरपालिकेचे कामकाज प्रशासन कालावधीत देखील अत्यंत प्रभावी ठेवले आहे. नगरपालिकेने उभारलेले वृक्ष उद्यान बायोडायव्हर्सिटी, रस्त्याच्या डिव्हायडरमधील यशस्वी वृक्षारोपण, उन्हाळ्याची चाहूल लागताच इंदापूर शहरात येणार्या सर्वच नागरिकांना चांगला नजराणा निर्माण करून देत आहे.
अकलूज इंदापूर रस्ता, तसेच इंदापूर बारामती रस्ता, पालखी स्थळ येथे वृक्षारोपण करून, हे वृक्षारोपण जपण्याचे काम इंदापूर नगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र घेत आहेत. इंदापूर बारामती रस्त्यालगत, नगरपालिकेने वृक्षारोपण केल्यामुळे कोणालाही अतिक्रमण करता आले नाही. तसेच या वृक्ष लागवडीमुळे नैसर्गिक समतोल मोठ्या प्रमाणात साधला जात आहे. नवीन बाजार समिती पर्यंत इंदापूर नगर परिषदेने आणखी वृक्षारोपण करून, स्वच्छ सुंदर हरित इंदापूर निर्माण करावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलेली आहे.
स्थानिक व्यापार्यांकडून मदत
इंदापूर शहरात खत विक्रेते फर्टीलायझर व्यापारी सांडलेले खत इंदापूर नगर परिषदेच्या वृक्ष लागवडीसाठी अनेक वेळा उपलब्ध करून देतात. त्यामुळे येथील झाडांचा पोत वाढण्यासाठी मोठी मदत होते.
इंदापूर ः बाबा चौक येथे डिव्हायडर मधील वृक्ष लागवडीचे संवर्धन करताना नगरपरिषदेचे कर्मचारी कामगार.





