Pune District : जेजुरीजवळ अपघातात आठ जणांचा मृत्यू

चार जण गंभीर जखमी : जखमींवर उपचार सुरू
जेजुरी – जेजुरी-मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोरील ढाब्यासमोर उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला स्वीप्ट डिझायरने दिलेल्या धडकेत एका महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना रात्री सव्वासातच्या सुमारास घडली.
दरम्यान, मृत्यू इंदापूर, बारामती, भोर तालुक्यांतील आहेत. यात ढाबा मालक, त्यांचा कामगार, पिकअप वाहनचालकांचा मृत्यू झाला.
सोमनाथ रामचंद्र वायसे (21), रामू संजीवन यादव, दोघेही (रा नाझरे क. प, ता. पुरंदर), अजयकुमार चव्हाण (रा. उत्तर प्रदेश), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारबाडी, ता. इंदापूर), अश्विनी संतोष येसार, (रा. नागणसूर, हैद्रे सोलापूर), अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता. बारामती), अशी अपघातील मृतांची नावे आहेत. यात एकाची अद्याप ओळख पटली नाही. सचिन बाजीराव तांबट (रा. कांजळे, ता. भोर), सोनाली किरण राऊत (रा. उद्धट, ता. इंदापूर), माही किरण राऊत (रा. उद्धट, ता. इंदापूर), सार्थक किरण राऊत (रा. उद्धट, ता. इंदापूर), अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मोरगावकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार जेजुरीकडून मोरगावकडे जात होती. एका कंपनीसमोरील हॉटेलमध्ये पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. यात स्विफ्ट कारमधील सहा जण तर पिकअपमध्ये असलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यावरुन, अपघाताची भीषणता घटनास्थळी दिसून येत होती.
अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनाही पाचारण केले. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत. जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





