Pune District : आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न करणार

राजगुरूनगर : अल्पवयीन मुलगी कबड्डीपटू होती, तिला जिल्हाधिकारी व्हायचे होते. पण एका नराधमाने तिचं आयुष्य नेस्तनाबूत केले. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मांजरेवाडी ग्रामस्थांना दिले.
एका नराधमाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून खून केला. डॉ. नीलम गोर्हे येथील पीडित कुटूंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. नराधम आरोपी नवनाथ मांजरे यांच्या अटकेनंतर पोलीस तपासात आणखी काय-काय समोर आलंय, याची माहिती गोर्हे यांनी घेतली. या कुटुंबाला मनोधर्य योजनेतून आर्थिक मदत लवकर मिळावी यासाठीही प्रयत्न केले जातील. या मदतीमुळे ते लेकरू परत येणार नाही.
त्यामुळे मूळतः ही विकृती ठेचण्याची गरज आहे. यासाठी सरकार कठोर पावले उचलेल, असा विश्वास गोर्हेंनी व्यक्त केला. आरोपीचा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान ग्रामस्थांनी गावच्या वतीने आरोपीला फाशी व्हावी. या मागणीचे गोर्हे यांना निवेदन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, माजी सरपंच भगवान मांजरे, जयसिंग मांजरे, योगेश मांजरे, अॅड. विठ्ठल नाणेकर, माजी सरपंच अमृत ठोंबरे, शिवसेनेच्या नेत्या विजयाताई शिंदे, नितीन गोरे, प्रकाश वाडेकर, अॅड. मनिषा टाकळकर, जयाताई बैरागी, गणेश सांडभोर, काका कुलकर्णी यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
मांजरेवाडी (ता. खेड) ःयेथे ग्रामस्थांशी चर्चा करताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे.





