पुणे जिल्हा : चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

आळंदी – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत अष्टपैलू विद्यार्थी घडविण्यासाठी अनेक शालेय, सहशालेय उपक्रम वर्षभर राबवले जातात. कला कार्यानुभव याविषयांतर्गत विद्यार्थी कागद, माती इ. पासून अनेक वस्तू बनवतात. यातूनच पुढे अनेक कलाकार निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी पर्यावरणाचा जपण्याचा संदेश देण्यासाठी प्रशालेत गणेशोत्सवा निमित्त पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेस शुभेच्छा देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, मूर्तिकार बाळासाहेब भोसले, शिल्पकार शरद लोहार उपस्थित होते. शरद लोहार व बाळासाहेब भोसले यांनी विद्यार्थ्यांना माती मळण्यापासून ते श्रीगणेशाची मुर्ती विविध टप्प्यांमध्ये साकारून दाखवली व विद्यार्थ्यांकडूनही बाप्पांच्या छानशा मुर्त्या तयार करून घेतल्या.
विद्यार्थ्यांनी मूर्ती बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.कार्यक्रमाचे नियोजन वर्षा काळे यांनी केले. या कार्यशाळेसाठी निशा कांबळे, वैशाली शेळके, प्रतिभा भालेराव, राहुल चव्हाण यांचे सहकार्य लाभले.





