Pune District : सरपंचाच्या प्रयत्नांमुळे देवीच्या मंदिराला मिळाली वीज

विंझर : राजगड (वेल्हे) तालुक्यातील आवळी, दादवडी आणि लव्ही ही तिन्ही गावे एकाच ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आहेत. या ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शंकर रेणुसे हे कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरात ओळखले जातात. ग्रामविकासाच्या बाबतीत ते नेहमीच अग्रेसर असतात.
दांडगा जनसंपर्क आणि ग्रामविकासासाठी कसलेली कंबर यामुळे ते पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधींसाठी आदर्श ठरत आहेत. नुकतेच त्यांनी आवळी आणि दादवडी या गावातील ग्रामदैवत असलेल्या आवळजाई आणि जननी माता मंदिरात वीज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तसेच लव्ही या गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेल्या विहिरीकडे वीज सुविधा उपलब्ध करून महिलांची होणारी गैरसोय दूर केली आहे.
१९८० या वर्षापासून म्हणजेच मागील सुमारे पंचेचाळीस वर्षांपासून आवळी आणि दादवडी या गावची ग्रामदैवत देवींची दोन्ही मंदिरे विजेच्या प्रतिक्षेत होती. नवरात्र तसेच देवीच्या इतर सण-उत्सवाच्या काळात विजेअभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात अंधारात वाट शोधत मंदिरात जाणे मुश्किल होत होते.
पण आता विजेची सोय झाल्याने ही परवड थांबणार आहे. सरपंचाच्या या कामगिरीमुळे गावांतील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. समस्त गावकरी लोकप्रतिनिधीचे उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक करत आहेत.
अर्थमंत्र्यांचे सहकार्य….
अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून डीपीसीसी निधीतून ही वीजजोड यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या कामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, जिल्हा महावितरण संचालक प्रवीण शिंदे,भोर-वेल्हे-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचे सहकार्य लाभले. ग्रामविकासासाठी ग्रुप ग्रामपंचायतीमधील नागरिकांची नेहमीच मदत होत असते. मतदारांच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी प्रयत्न करत आहे. भविष्यातील कारकिर्दीत अजूनही काही कामे पूर्ण करायची आहेत, असे सरपंच शंकर रेणुसे यांनी सांगितले.





