पुणे जिल्हा : सारिका भरणे यांच्या घरोघरी भेटी

दत्तात्रय भरणे यांचा गणेशवाडी परिसरात जोरदार प्रचार
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील बावडा परिसरातील गणेशवाडी भागात राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सारिका भरणे यांनी गावातील प्रत्येक कुटुंबीयांच्या घरभेटी घेत,घड्याळ चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवले आहे.
यावेळी सारिका भरणे म्हणाल्या, राज्यातील महिला भगिनींना न्याय देण्याची भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून घेतल्यामुळे आपल्या गावाकडील घराघरात शासनाच्या माध्यमातून महिलेचा सन्मान झाला. इतिहासात पहिल्यांदाच महिलांचा सन्मान या योजनेतून झाल्याने महिला सक्षम बनण्यास मोठी मदत झाली आहे.
तालुक्यातील एकही महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये म्हणून, आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात शासनाची मोहीम परफेक्ट राबवली. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लाभ इंदापूर तालुक्यातील महिलांना मिळाला.
त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील महिला वर्ग आमदार भरणे यांच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र प्रत्येक गावोगावी दिसत आहे. महिलांनी प्रत्येक घटकाला घड्याळ चिन्ह समजावून सांगावे, असे आवाहन यावेळी सारिका भरणे यांनी केले.





