पुणे जिल्हा : गावडेवाडी पाण्याच्या टाकी प्रकरणाची सखोल चौकशी करा

वाघोली : हवेली तालुक्यातील ग्रामपंचायत शिरसवडीच्या हद्दीतील मौजे गावडेवाडी येथे पाणीच्या टाकीसाठी खरेदी केलेल्या जागेत पाण्याच्या टाकीचे बांधकाम न करता आर्थिक नफ्यापोटी एका खाजगी जागेत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करून अंगणवाडीच्या लहान मुलांच्या जिवीतासही धोका निर्माण केल्याचा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ दत्तात्रेय गावडे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे केली आहे.
याबाबतीत सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गावडे यांनी सांगितले की ग्रामपंचायत शिरसवडीच्या हद्दीतील मौजे गावडेवाडी येथे जल-जीवन मिशन योजने अंतर्गत नवीन पाण्याच्या टाकीचे वांधकाम प्लॉटिंग व्यावसायिकांच्या नफ्यासाठी खाजगी जागेत करणेत आल्यामुळे, तसेच सदरील टाकीचे बांधकाम अंगणवाडी व विजेच्या डीपीच्या शेजारील जागेत करून लहान मुलांच्या जिवीतासही धोका निर्माण झाल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे.
मौजे गावडेवाडी येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणेकरीता ग्रामपंचायत शिरसवडीने सन २०१४ मध्ये गावडेवाडी येथील गट नंबर १२० मधील ०१ आर क्षेत्र दस्त क्रमांक ९६५०/२०१३ अन्वये बक्षीसपत्राने खरेदी केलेले आहे. ही जागा वस्ती मध्येच असताना या जागेत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले नाही.
याशिवाय गावडेवाडी येथे अंगणवाडीचे बांधकाम करणेकरीता ग्रामपंचायत शिरसवडीने सन २०१५ मध्ये गट नंबर १२१ मधील ०२ आर क्षेत्र दस्त क्रमांक १०४०/२०१५ अन्वये बक्षीसपत्राने खरेदी केलेले असून त्या जागेत अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आलेले आहे.
गावडेवाडी येथील गट नंबर १२१ मध्येच नवीन पाण्याचा टाकीचे बांधकाम करण्यात आले असून, टाकीचे अंतर अंगणवाडी पासून केवळ ३० फुटापेक्षाही कमी असून, त्यासोबतच विजेची डीपीही अंगणवाडी पासून १५ फुटापेक्षा कमी अंतरावर बसवण्यात आलेली आहे.
नवीन पाण्याचा टाकीचे बांधकाम अंगणवाडीच्या जागेतच करण्यात येत असल्याची बाब मा. उप अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत समिती हवेली, पुणे यांचे पत्राद्वारे समजली आहे.परंतु अंगणवाडीचे बांधकाम करण्यासाठी केंद्र शासनाने नियमावली जाहीर केलेली आहे त्याप्रमाणे अंगणवाडी करिता कमीतकमी १.५ आर ते २ आर जागा आवश्यक आहे. अंगणवाडीची खरेदी केलेली जागाही ०२ आर एवढीच आहे. नवीन पाण्याच्या टाकी करीता ग्रामपंचायतीने नवीन जागेची खरेदी केली नाही. जवळ असणाऱ्या अवैध प्लॉटिंग व्यवसायाला मदत व्हावी या उद्देशाने पाण्याची टाकी एका खाजगी जागेत उभी केल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे.
माहिती अधिकारातून अजब माहिती उघड ..
२० मार्च रोजी अर्ज करून महिला बालकल्याण अधिकारी यांची एन ओ सी ची मागवलेली माहिती जवळपास अडीच महिन्यांनी मिळाली. गावडेवाडी अंगणवाडी सेविका यांनी ग्रामपंचायत ची पाण्याची टाकी दोनशे फूट अंतरावर असून आहे त्यापासून अंगणवाडीस काही धोका नाही पत्र असे दिले आहे. वास्तविक टाकी ही अंगणवाडी पासून ३० फुटांपेक्षा कमी अंतरात बांधलेली आहे.
गावडेवाडी पाण्याच्या टाकी ची जागा बदलण्याबाबत ग्रामपंचायत कडून तसा प्रस्ताव ठरावा नुसार सादर करण्यात आला होता. ज्या जागेत पाण्याची टाकी बांधली आहे त्या बाबतीत शासकीय मोजणी करून तसा अहवाल पाठवण्याबाबत ग्रामपंचायतीस पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सदर जागेची मोजणी करून पुढील योग्य ते निर्णय घेण्यात येणार आहे.
कलिका खरात
उप अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा पंचायत समिती हवेली





