Pune District : वंचित घटक शिक्षणाच्या प्रवाहात

माळेगावात शिवज्ञ प्रतिष्ठानचा कौतुकास्पद उपक्रम
माळेगाव – वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना माळेगाव बुद्रुक येथील अनिकेत सुखदेव बोबडे यांच्या शिवज्ञ प्रतिष्ठानतर्फे प्रगतीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव बुद्रुक क्रमांक १ (मुलांची), केंद्रात शिवनगर (ता. बारामती) येथील गरजू शालेय विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप केले.
यावेळी देणाऱ्याच्या डोळ्यांतील भाव व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी हावभाव याचा सुरेख संगम कार्यक्रमात दिसून आला. यावेळी सुखदेव बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, माजी सरपंच दीपक तावरे, कारखान्याचे संचालक शिवराज राजे जाधवराव, ॲड. राहुल तावरे, अमर तावरे, नंदकुमार पोळ, यशवंत भिगवणकर, अशोक भोसले, अक्षय जाधव, सागर नलावडे, सागर कुचेकर, अभिजीत बोबडे, तानाजी खांडेकर, ज्ञानेश्वर सानप, अमोल राऊत, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता लकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पाटी, पेन्सिली, वह्या,पेन, डबा पिशवी, पाणी बाटली, मराठी- इंग्रजी अंकलिपी, रंगपेटी आदी सुमारे अकरा हजार रुपये किमतीचे साहित्य ११० विद्यार्थ्यांना वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. रमेश कवितके यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका संगिता लकडे यांनी आभार मानले.
प्रत्येकवर्षी शाळेस माझे योगदान राहिल
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनिकेत बोबडे म्हणाले की, विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती असून विकसित भारत घडविताना व समाजाच्या भविष्यातील गरजा, अडचणी सोडविताना विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारे शिक्षण हे उपयुक्त ठरत असते. यासाठी सर्व गुरुजन अविरत प्रयत्न करतात. मलाही ज्या गुरुजनांनी घडविले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करण्यासाठी वंचित व गरजू घटकातील प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याला प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे म्हणून हा उपक्रम हाती घेतला. यापुढेही प्रत्येक वर्षी शाळेस माझे सर्वच बाबतीत योगदान राहील, याची ग्वाही त्यांनी दिली.





