ओतूर : ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरीच्या जयघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज यांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पायी पालखीचे ओतूर (ता. जुन्नर) येथून पंढरपूरला आषाढी वारीसाठी शनिवारी (दि. 14) प्रस्थान झाले असल्याची माहिती पालखी सोहळा वारकरी संत सेवा समिती ओतूरचे अध्यक्ष आत्माराम गाढवे व सचिव अनिल तांबे यांनी दिली. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराजांची ओतूर येथे संजीवन समाधी आहे. यामुळे ओतूर येथून जाणार्या या पालखीला पंढरपूर पायी वारी सोहळ्यात मानाचे स्थान असून ओतूर ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू केलेल्या या पालखी सोहळ्याचे हे 65 वे वर्ष आहे. शनिवारी (दि. 14) रोजी या पालखी सोहळ्यास सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरापासून सुरूवात झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात व राम कृष्ण हरी या जयघोषात पालखी सोहळा निघाल्यानंतर ओतूर पोलिसांकडून सहायक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी पोलीस ठाण्यासमोर पालखी सोहळ्याचे स्वागत करून भाविकांना चहा, नाष्टा देण्यात आला. त्यानंतर ओतूर शहराला नगर प्रदक्षिणा घालून नंतर पालखीचा पहिला मुक्काम ओतूर शहरातील मुख्य चौक पांढरी मारूती मंदिरात झाला. त्यानंतर रविवारी सकाळी शंकर भगवंत डुंबरे यांनी सपत्नीक पालखीची पूजा केली. त्यांनतर ओतूर येथून पालखी भव्य मिरवणूक निघाली. त्यामध्ये आंबी दुमाला व जयमल्हार (संगमनेर) टाळ पथक, धोलवड येथील लेझीम पथकाचा सहभाग होता. तसेच महिलांचे टाळ पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेले होते. सर्वत्र रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष चालू होता. पालखी सोहळ्यात संस्थापक महादेव तांबे, रघुनाथ तांबे, विलास घुले, ज्ञानेश्वर पानसरे, सीताराम डुंबरे, शांताराम पानसरे, शांताराम महाराज वायकर, सरपंच छाया तांबे, प्रशांत डुंबरे, वैभव तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे, शरद बँकेचे संचालक विनायक तांबे, अनिल डुंबरे, गंगाराम डुंबरे, वैशाली शेलार, आशा डुंबरे, सुनील डुंबरे तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा पायी पालखी ओतूर, आळे, बेल्हा, पाडळी, लोणी मावळा, रांधे दरोडी फाटा, वडझिरे, पारनेर, पाणोली घाट, पिंपळनेर, राळेगण सिद्धी, ढवळगाव, उक्कडगाव, बेलवंडी, श्रीगोंदा, घोडेगाव, चांदगाव, टाकळी, जलालपूर, सिद्धटेक, बेर्डी, सिध्दटेक, बारडगाव, येसवडी, राशीन, कोर्टी, विहाळ, वीट, झरे, वांगी कविटगाव, कंदर, टेंभुर्णी, अरण, मोडलिंब, आष्टी, बाबळगाव मार्गे पालखी 19 दिवसांनी गुरुवारी (3 जुलै) पालखी पंढरपूर येथे दाखल होणार आहे. वारकर्यांचा 42 दिवसांचा प्रवास – पंढरपूर येथे सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवार (10 जुलै) परतीचा प्रवास सुरु होणार आहे. 25 जुलै रोजी पालखीचे ओतूर येथील पांढरी मारूतीचे मंदिर येथे पुनरागमन होणार आहे. एकूणच हा वारकर्यांचा प्रवास 41 दिवसांचा आहे. या पालखी सोहळ्याचे सर्व नियोजन श्री बाबाजी चैतन्य महाराज प्रासादिक भजन मंडळ व समस्त ग्रामस्थ ओतूर हे करीत आहे.