Pune District : हरीण, रानडुकराच्या कळपांचा उभ्या पिकात धुमाकूळ

बेल्हे : अणे (ता. जुन्नर) येथे रानडुकरांच्या व हरणांच्या कळपाने शेतकर्याचे प्रचंड नुकसान करीत आहेत. अणे, नळवणे, पेमदरा, शिंदेवाडी गावांत शेकडो शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान हे वन्य प्राणी करत आहेत. वनविभागाने याची दखल घेऊन यावर उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे.
अणे, नळवणे, पेमदरा, शिंदेवाडी या परिसरातील मळारान व बहुतांश डोंगराळ भाग असल्याने या परिसरात नेहमीच वन्य प्राणी आढळत आहेत. हरणांचे कळप दिवसा नागरिकांना दिसतात.
बिबट्याच्या भीतीनंतर आता शेतकर्यांनी रानडुकराच्या व हरणांच्या कळपांचा वारंवार होणार्या शेती पिकांच्या नुकसानीचा धसकाच घेतला आहे. अनेक उपाय करून देखील रानडुकराचे कळप शेतात उभ्या असणार्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत.
संबंधित शेतकर्यांनी वनविभागाला नुकसानीबाबत कळवावे. शेतकर्यांनी योग्य प्रकारे अर्ज करून द्यावा. वनविभाग, तलाठी, कृषी अधिकारी एकत्रित पंचनामा करतील. सबंधित शेतकर्यांना शासकीय मदत मिळू शकते.
– लहू ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर
…तर आम्हाला परवानगी द्या !
शेतकर्यांच्या शेतीमालावर वारंवार होणार्या रानडुकराच्या हल्ल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकर्यांना त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अथवा आम्हाला त्यांचा बंदोबस्त करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.





