मतमोजणीत गडबड : योगेश चौधरी यांचा आरोप पाबळ – पाबळ शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक पाच महिन्यांपूर्वी होऊन अध्यक्षाची निवड झाली. मात्र अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेला वाद शमला, असे वाटत असताना मतमोजणीत गडबड करून माझ्याऐवजी सोपान जाधव यांना विजयी घोषित केले असल्याचे संस्थेतून मिळालेल्या निकालाचे सत्यप्रतीतून सिद्ध होत असल्याचा आरोप विरोधी पॅनलचे उमेदवार योगेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला. सभासद, ग्रामस्थ व धर्माँदाय खात्याने याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. दि. 21 जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत अध्यक्षपदासाठी सोपान जाधव व योगेश चौधरी अध्यक्षपदासाठी उमेदवार होते. मतमोजणीनंतर 40 मतांनी सोपान जाधव विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर (पहाटे चार वाजता) तासाभरात उमेदवार योगेश चौधरी यांचे चुलते कांताराम चौधरी यांचे हृदयविकाराचे झटक्याने निधन झाले होते, त्यामुळे निकालाची कागदपत्रे घेण्यात आली नव्हती. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी योगेश चौधरी यांचे बंधू संदेश चौधरी यांनी निकालासंदर्भात कागदपत्रे मागितली. त्यात मुख्य निवडणूक अधिकारी प्रा. घोडेकर व सहायक निवडणूक अधिकारी अविनाश क्षीरसागर यांनी उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रतीतून 116 मतांनी मी विजयी झालो असल्याचा दावा योगेश चौधरी यांनी केला आहे. याबाबत विजयी घोषित केलेले उमेदवार सोपान जाधव यांनी सोशल मीडियामार्फत हे सर्व दावे नाकारले असून दांडगाई करून कागदपत्रात बदल घडवून निवडणूक अधिकारी यांना दमदाटी करून ही कागदपत्रे हस्तगत केल्याचा आरोप केला असून पोलिसांत तक्रारी दाखल केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, हे प्रकरण शिक्षण संस्थेशी निगडित असून गावातील ज्येष्ठ नागरिकांनी स्थापना केलेली संस्था आहे. याबाबत भविष्यात हे प्रकरण वाढून धर्मदाय आयुक्त कार्यालयात वाढवले गेल्यास कायदेशीर नियमांचे पालन करता निवडणुका पार पाडल्या गेल्या असल्यास संस्थेवर प्रशासक नेमला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.