Pune District : संत ज्ञानेश्वर महाराज 750व्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सव सोहळ्याचे निमित्त साधून दि. 3 ते 10 मे दरम्यान आळंदीत भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चाकणरोड येथे भाविकांसाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजारो भाविक या सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाले होते. शुक्रवारी (10 मे) सायंकाळी काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली, त्यानंतर भाविक आपापल्या गावी परतले.
देवस्थानतर्फे भाविकांसाठी ठिकठिकाणी मोफत निवास, भोजन, पिण्याच्या पाण्याचे टँकर, स्नानगृहे, आरोग्य सुविधा आणि पार्किंग व्यवस्था यांची उत्तम सोय करण्यात आली होती. 10 मे रोजी दुपारी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले, तसेच महाप्रसादाचे वितरण झाले, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. भाविकांनी स्वयंशिस्त दाखवत परिसर स्वच्छ ठेवण्यात योगदान दिले, ज्यामुळे व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले.
9 मे रोजी श्रींचा रथोत्सव आणि इंद्रायणी घाटावरील दिपोत्सव उत्साहात साजरे झाले. त्याचदिवशी वडगाव घेनंद, भोसे आणि परिसरात जोरदार पाऊस झाला, तर 10 मे रोजी रात्री आठच्या सुमारास आळंदीत वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे मंडपातील पत्र्यांवरून पाणी पडल्याने परिसर काहीसा चिखलमय झाला. तरीही, माऊलींच्या कृपेने हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला, असे भाविकांनी सांगितले.
सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल आळंदी देवस्थान आणि स्वयंसेवकांचे कौतुक होत आहे. भाविकांनी निवास, भोजन आणि इतर सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. सध्या मंडप काढण्याचे काम जोमाने सुरू आहे. या सोहळ्याने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा वारसा पुन्हा एकदा अधोरेखित केला.





