पुणे जिल्हा : माळरानावर पिकवली लाखो रुपयांची ढोबळी मिरची

– नागापूरच्या शेतकऱ्याने प्रतिकूल हवामानातही दर्जदार पीक
मंचर – आंबेगाव तालुक्यातील नागापूरच्या शेतकऱ्याने माळरानावर लाखो रुपयांची ढोबळी मिरची पिकविली. मिरचीचे उत्पादन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. नागापूर येथील प्रगतशील शेतकरी केरभाऊ बाबुराव चासकर (गुरुजी) यांनी आपल्या शेतात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात इंडस -11 या संकरित ढोबळी मिरचीच्या जातीची लागवड केली. प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा ढगफुटीसदृश्य पाऊस तसेच सतत महिनाभर पडणारा पाऊस व धुके यांचा सामना करत ढोबळी मिरचीचे पीक घेतले. दर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने सतत फवारण्या करत शेडनेट, पॉलिहाऊसच्या तोडीचा अतिशय दर्जेदार मिरची पिकविण्यात त्यांना यश आले.
आतापर्यंत चार ते पाच तोड्यांना ८०० ते ८५० रुपयांचा १० किलोसाठी विक्रमी दर मिळून मिरचीच्या एका तोड्याला एक लाख रुपयाचे उत्पन्न ते होत आहे. इंडस -11 या संकरित ढोबळी मिरचीचे वैशिष्ट्य म्हणजे एका मिरचीच्या नगाचे सरासरी वजन ६० ते ८० ग्रॅम इतके भरते. त्यामुळे या मिरचीला बाजारात चांगली मागणी असते. तसेच या मिरचीच्या झाडाला फुटवेही चांगले निघत असतात.
अजूनही चार ते पाच तोडे होण्याची त्यांना खात्री आहे. हे पीक घेण्यासाठी केरभाऊ बाबुराव चासकर गुरुजी यांना त्यांची पत्नी शकुंतला, मुलगा कालिदास, राजेंद्र व विजय तसेच सून सुनीता, शैला, पुनम यांचे सहकार्य लाभले. मिरची पिकाचे निघालेले उत्पादन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
प्रतिकूल वातावरणातही दर्जेदार उत्पन्न
ढोबळी मिरचीला जमीन चांगली कसदार व सुपीक लागते. मध्यम ते भारी काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. नदीकाठच्या पोयटयाच्या सुपिक जमिनी लागवडीस योग्य ठरतात. मात्र, नागापूर येथील शेतकरी केरभाऊ चासकर यांनी माळरानावरच्या जमिनीत ढोबळी मिरचीचे पीक घेऊन दाखवले. तेही अतिपाऊस आणि प्रतिकूल हवामानात असे पीक घेऊन दाखवले, ते पाहण्यासाठी त्यांच्या शेतावर शेतकरी व ग्रामस्थ गर्दी करीत आहे.
एकरी पिकासाठी ७० हजार रुपये खर्च
एक एकरी पीक तयार करण्यासाठी त्यांना जवळपास ७० हजार रुपये खर्च आला. जमीन मशागत- पाच हजार रुपये, शेणखत-चार ट्रॉली खत-वीस हजार रुपये, रासायनिक खते- दहा हजार रुपये, औषधे-दहा हजार रुपये, मल्चिंग पेपर-७ हजार रुपये, वाहतूक व मजुरी खर्च -दहा हजार रुपये तसेच त्यांनी रोपवाटिकेतून इंडस -11 या जातीचे रोपे ६ हजार काडी रोपे एक रुपया साठ पैसे दराने त्याचे ९ हजार ६०० रुपये प्रमाणे शेतामध्ये लागवड केली.





