पुणे जिल्हा : बागायती पट्ट्यात परिवर्तन की विकास?

सोमेश्वरनगर परिसरात मतदारांचा निर्णायक कौल
विजय लकडे
सोमेश्वरनगर – बारामती विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार, अशी लढत मतदारांना पहावयास मिळाली. या लढतीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष विधानसभेच्या रणधुमाळीकडे लागून राहिलेले होते. राज्यातील सर्वात मोठी हायहोल्टेज लढत बारामती मतदारसंघांमध्ये झाली. काका आणि पुतण्या यांच्यात झालेल्या लढतीमुळे बारामती विधानसभेत मतदाराचा टक्का देखील वाढला दिसला. हा वाढीव टक्का कोणाच्या पारड्यात मतदान करतो, यावरच बरच काही अवलंबून आहे. ७१.७० टक्के मतदान झाले. तीन लाख ८० हजार ६०८ मतदारांपैकी दोन लाख ७२ हजार ४०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एक लाख २९ हजार ४०२ महिला तर एक लाख बेचाळीस हजार ९९६ पुरुष व ११ तृतीयपंथी यांनी मतदान केले.
बारामतीच्या पश्चिम भागातील बागायती भागातील मतदारावेळी बारामतीच्या विकासाला साथ देणार की परिवर्तनाला हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या बागायती पट्ट्यातील विविध संस्था, बहुतेक गावच्या ग्रामपंचायती, सोसायटी, राज्यात अग्रेसर असणारा सोमेश्वर कारखाना अजित पवार गट राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने गत हंगामात सोमेश्वर साखर कारखान्याने उसाला दिलेल्या उच्चांकी भावाने या भागात कार्यकर्त्यांची मोठी फळी विधानसभेला अजित पवार यांच्यासाठी कार्यरत होती.
याउलट नवखे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी गेली साठ वर्षे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात व बारामती लोकसभा व विधानसभेच्या राजकारणात आपल्या वलयाने स्थान निर्माण केलेल्या शरद पवार, नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते देखील जोमाने उतरलेले दिसले.
यामध्ये बागायती पट्ट्यातील जुने साहेबप्रेमी कार्यकर्ते तर त्यांच्या अधिपत्याखाली तयार झालेले युवा कार्यकर्ते हेही हे झटताना दिसले. निंबूत, सोमेश्वर, करंजे पूल, वाणेवाडी, मुरूम, वडगाव, कोऱ्हाळे या भागामध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते सक्रिय झाले. त्यामुळे बागायती पट्ट्यामध्ये अजित पवार गटाची सरशी होणार काय, याची चर्चा सुरू झाली आहे.
बारामती विधानसभेला पवार विरुद्ध पवार या सामन्यामुळे बारामती विधानसभेतील बाहेरगावातील मतदारांनाही आणण्याचा प्रयत्न करून त्यांचे मतदान करून घेतले गेले. त्यामुळेही मतदानाचा टक्का वाढलेला आपणास दिसत आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रत्येक गावातील बूथ वाईस याद्या काढून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केलेला दिसला. त्यामुळे बारामती विधानसभा अगदीच रंगतदार अवस्थेत आहे.
या बागायती पट्ट्यामध्ये संपूर्ण पवार कुटुंबीयांनाही मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार गटाचा तालुक्याचा झालेला विकास, प्रत्येक गावात झालेली विकासकामे यावरती जोर होता.
पवार साहेबांनी मी तीस वर्षे तालुका सांभाळून बाजूला झालो, अजितने तीस वर्षे तालुका सांभाळला आता नवीन उच्चशिक्षित युवकाला संधी देऊन पुढील ३० वर्षे चांगल्या पद्धतीने तालुक्याचा विकास करू, अशी भावनिक साद घातली. दोन्हीही गटाच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पारडे कोणाकडे झुकणार याची उत्सुकता सामान्य मतदाराला देखील होती,
बागायती पट्ट्यातील काही गावांमध्ये गेली अनेक वर्ष गाव सांभाळलेल्या नेत्यांना यावेळी मतदार राजा लोकसभेप्रमाणे झटका देणार की विधानसभेला अजित पवार यांची विकासाची दूरदृष्टी पाहु्न विकासाला साथ देणार यावरच बरेच काही अवलंबून आहे. सामान्य मतदारांनी मात्र आपल्या पोटातील ओठावर न आणल्यामुळे मतदाराची भूमिका गुलदस्त्यात राहिलेली दिसत आहे.





