Pune District : मुख्यमंत्री सोडून डायरेक्टर व्हायला लागलेत चंद्रराव तावरे यांचे अजित पवारांवर टीकास्त्र

बारामती : उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत, त्यांनी काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली आहे, असा थेट सवाल चंद्रराव तावरे यांनी विचारला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत. अजित पवार यांनी प्रचार सभेत तावरे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर तावरे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवारांना जर लोकांचं कल्याण करायचं होतं तर छत्रपती कारखान्याच्या माध्यमातून का केलं नाही? अजित पवारांचे जे कारखाने आहेत, त्या कारखान्यांना ते दर का देत नाहीत, असा सवाल तावरे यांनी केला आहे. खासगी कारखानदारीचे पोषण करणाऱ्या तालुक्याच्या नेत्याला सहकाराबद्दल बेगडी प्रेम असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
एवढे वर्ष सत्तेत राहून एकही सहकारी उद्योग व्यवसाय त्यांना सुरू करता आला नाही. पणदरे येथे सुरू केलेली सूतगिरणी त्यांनी बंद पाडली. त्यांच्या नेतृत्वातील छत्रपती कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. छत्रपतीचे सभासद मेटाकुटीला आले आहेत. चुकीच्या कारभारामुळे सभासदांची आयुष्यातील वीस वर्षे वाया गेली. माळेगाव कारखान्याची दुर्दशा केली आहे. अंबालिका हा सहकारी कारखाना होता. त्याला मदत न करता तो लिलावात काढला. सरकारी कर्ज माफ करून घेऊन तो विकत घेतला. तो अडीच हजार टन क्षमतेचा कारखाना आता प्रतिदिन २० हजार टनाने चालत आहे. त्यांना सहकाराबद्दल काय आस्था असणार, असा टोला चंद्रराव तावरे यांनी पवार यांना लगावला.
माळेगावला पाच वर्षे विक्रमी भाव देणार असल्याचे अजित पवार यांनी प्रचार सभेत सांगितले, यावर तावरे म्हणाले, अंबालिका, दौंड शुगरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी भाव का दिला नाही. छत्रपती कारखाना हा त्यांचा घरचा कारखाना तो त्यांना चालवता आला नाही. शेजारचा माळेगाव कारखाना ते काय चालवणार, असा सवाल त्यांनी केला.
पावसात माळेगावची ६० हजार पोती साखर भिजली. ११ कोटी ४० लाख नुकसान झाले. याचा जाब अजित पवारांनी संचालक मंडळाला का विचारलं नाही. विस्तारवाढीस देखील सत्ताधाऱ्यांनी विरोध केला. को- जन, डिसलरीसारखे इतर उद्योग व्यवसाय उभारताना देखील त्यांचा विरोधच होता.





