Pune District : चाले पूल दुचाकी व हलक्या वाहनांसाठी खुला

पौड – चाले येथील पुलाचे बांधकाम अजूनही काही प्रमाणात होणे बाकी आहे; परंतु वाहनचालकांची होणारी गैरसोय व पर्यायी मार्गाने प्रवास करताना होणारे हाल लक्षात घेऊन चाले पूल फक्त दुचाकी व हलक्या वाहनांसाठी (चारचाकी) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खुला करण्यात आला आहे. यामुळे पौड-कोळवण काशिग प्र.जि.मा.26 वरुन प्रवास करणार्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोळवणकडील वाहनचालकांना चाले, मुगावडे, घोटावडे गाव हनुमान चौक ते घोटावडे फाटा मार्गे पुणे किंवा पौड असा पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार नाही. तर पुणे किंवा पौड कडून येणार्या वाहनचालकांना घोटावडे फाटा मार्गे हनुमान चौक घोटावडे गाव मुगावडे, चाले, गारटेक कंपनी मार्गे कोळवण असा वळसा घालून प्रवास करावा लागणार नाही.
चाले पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने कामगार, दूध व्यावसायिक, शेतकरी, विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांना या मार्गावर प्रवास करणे सुलभ झाले आहे. चाले येथील पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही म्हणून खासदार सुप्रिया सुळे, आमदार शंकर मांडेकर, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी स्वतः पुलाची पाहणी करून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बांधकाम विभागास पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सुचना केल्या. याबरोबरच कोळवण खोर्यातील, सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी सतत पाठपुरावा केला. प्रसंगी पुलाचे काम पूर्ण व्हावे म्हणून अगदी भर पावसात भिजत सर्व पक्षीय आंदोलन देखील केले होते.
पुलाचे काम अपूर्ण
पुलावरील क्युअरिंग वेअर (धावपट्टी वरील डांबरीकरण) कोळवणकडून व पौडकडून येणार्या रस्त्यावरील पुलास जोडणारी दोन्ही बाजूकडील धावपट्टी तसेच रस्त्यावरील व पुलावरील साफसफाई बाकी आहे. पुलाच्या कामासाठी आलेल्या कामगारांना राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभी केलेली पत्राची शेड अर्ध्या रस्त्यात आहेत. अपूर्ण सुरक्षा कठडे व त्यांच्या रंगरंगोटीचे काम बाकी आहे.
चाले पूल दुचाकी व चारचाकी (हलकी वाहने) वाहनांसाठी खुला केला आहे. तरी येथील पुलाचे काम अद्यापही बाकी असल्याने अवजड वाहनांना येथून प्रवेश बंद आहे. तसेच येथून प्रवास करताना वाहनचालकांनी सुरक्षितपणे प्रवास करावा. अधिकृत लवकरच वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे.
-विनय जाधव, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मुळशी





