Pune District : भाडेकरूंची माहिती न देणार्या घरमालकांविरोधात गुन्हे दाखल

लोणी काळभोर : भाडेकरूंची माहिती पोलीसांना न कळवणार्या तीन घरमालकांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित घरमालकांनी आपापल्या भाडेकरुंची माहिती तातडीने द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.दिलीप अजिनाथ तकीक (वय 33, रा. सुतारपट्टी, गुजरवस्ती, कवडीपाट, कदमवाकवस्ती), सरोजा प्रताप जाधव (वय. 49, रा. गणराज पार्क, कवडीपाट) व शिवाजी सुदाम कांबळे (वय 60, रा. स्वामी विवेकानंदनगर, कदमवाकवस्ती) अशी गुन्हा दाखले केलल्यांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 163 (3) प्रमाणे घरमालक यांनी भाडेकरु ठेवताना तसेच खासगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षिततेबाबत दक्षता घ्यावी. ही माहिती पोलिसांना कळविणे बंधनकारक असलेबाबत आदेश काढलेले आहेत. त्याबाबत पोलिसांतर्फे वेळोवेळी प्रसार माध्यमांद्वारे त्याची प्रसिध्दी करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भाडेकरुंबाबत माहिती तसेच हद्दीमधील हॉटेल, लॉजेस व गर्दीचे ठिकाणी भेटी देण्यासाठी वरिष्ठांचे आदेशाने पोलीस ठाणे स्तरावर दोन पथके निर्माण करण्यात आली होती. भाडेकरुंची माहिती घेणारे पथकास तीन घरमालकांनी भाडेकरु ठेवल्यानंतरही त्याची माहिती पोलिसांना कळविली नाही. त्यामुळे दिलीप तकीक, सरोजा जाधव व शिवाजी कांबळे यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 223 प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले असुन तपास सुरु आहे.
ज्या घरमालकानी भाडेकरू ठेवलेले आहेत. त्यांनी भाडेकरूंची माहिती तसेच खासगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षिततेबाबत दक्षता घेणे करिता ही माहिती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163(3) प्रमाणे पोलीसांना देणे बंधनकारक असल्याने ही माहिती तातडीने सादर करावी.
-राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक





