Pune District : खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कार-दुचाकीचा अपघात
Updated On:

मंचर – आंबेगाव तालुक्यातील अवसरी – पारगाव रस्त्यावर मेंगडेवाडी गावच्या हद्दीत गण्या डोंगर जवळ दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात सोमवारी (दि. 21) सकाळी झाला.
या अपघातात दुचाकी चालक सचिन ज्ञानेश्वर पडवळ वय 29 हे जखमी झाले असून त्यांच्यावर पारगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात हा रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात झाला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. दरम्यान, पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
अवसरी ते पारगाव या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असून खड्ड्यांमुळे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बूजवावे, अशी मागणी मेंगडेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब मेंगडे यांनी केली आहे.





