Pune District : पुरंदर तालुक्यातील गावांचे सिटी सर्व्हे रद्द करा

सासवड : पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोजणी विभागाने सिटी सर्व्हे केलेले आहेत. हे सर्व्हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चुकीचे केलेले असून गावागावांतून नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. लोकांच्या खासगी जागांना देखील या विभागाने शासनाचे नाव लावलेले असून हे नाव कमी करण्यासाठी लोकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे एकतर संपूर्ण सर्व्हे रद्द करावा किंवा लोकांना त्रास न देता एकखिडकी योजना तयार करून या दुरुस्त्या करून द्याव्यात, अशी मागणी पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी केली आहे.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी (दि. 25) विधान भवन पुणे येथे पार पडली. याबैठकीत शिवतारे यांनी वरील मागणी केली आहे. यावेळी बैठकीला जिल्ह्यातील आमदार खासदार व पुणे – पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिवतारे म्हणाले, गावागावात केलेल्या सिटी सर्व्हेमुळे कुठलाही फायदा न होता लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. कुणाच्या जागा ग्रामपंचायत रेकॉर्डप्रमाणे लागलेल्या नाहीत तर कुणाच्या घराची नोंद होऊन अंगणाला सरकारचे नाव लागलेले आहे. यावर पालकमंत्री अजित पवार यांनी तत्काळ जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांना याबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
याशिवाय जिल्हा नियोजन बैठकीत पोलीस स्टेशन इमारतीसाठी जागा हस्तांतरण, नगरपालिका आवारात महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे आणि सासवड येथील बाजारासाठी दिवे गायरान क्षेत्रातील जागा हस्तांतरण करणे आदी विषयांवर देखील चर्चा झाली.
अद्याप नगरपालिकेला हस्तांतरीत नाही
फुरसुंगी, उरुळी देवाची नगरपरिषद नव्याने अस्तित्वात आली असली तरी अजून रस्ते, शासकीय इमारती आणि अॅमेनिटी स्पेस अशा मालमत्ता अद्याप नगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत. याशिवाय टीपी स्कीम क्र 6, 9 आणि 10 या देखील मनपाकडून नगरपरिषदेला द्याव्यात. यावर पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना तत्काळ हस्तांतरण करावे, अशा सूचना दिल्या आहेत.





