रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला लोणी काळभोर : दिवाळी सणानिमित्त घर बंद करून मूळ गावी गेलेल्या नागरिकांच्या घरांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सिद्राममळा परिसरात उघडकीस आली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह चालू बाजार भावाप्रमाणे सुमारे 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. पोपट भगवान चव्हाण (वय 46, रा. राजनंदिनी पार्क, सिद्राममळा, लोणीकाळभोर; मूळ निमसाखर) व सूरज रामचंद्र आगरकर (रा. लोणी काळभोर) यांच्या घरी चोरी झाली आहे. याप्रकरणी पोपट चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पोपट चव्हाण हे नोकरदार असून लोणी काळभोर येथील राजनंदिनी पार्क येथे कुटुंबासोबत राहतात. दीपावलीच्या सणानिमित्त सुट्टी मिळाल्याने कुटुंबासोबत मूळ गावी गेले होते. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून घरामध्ये प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील 10 हजार रुपये रोख, सोन्याची अंगठी व मंगळसूत्र असा चालू बाजारभावानुसार 85 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दुसर्या घटनेत सूरज आगरकर यांच्या घरातून चोरट्यांनी 35 हजार रुपये रोख व 3 तोळ्यांचे गंठण, 2 तोळ्यांची कानातील फुले असे 3 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या दोन्ही घरफोडीत चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तिसरी घटना पाडव्याच्या दिवशी घडली. लोणी काळभोरमधील एका महिलेच्या घरातून 1 लाख 76 हजार रुपयांचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. तक्रारदार महिलेने लक्ष्मीपूजनानिमित्त दागिने कपाटातून काढून ठेवले होते. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर महिलेने आपले दागिने टेबलवर ठेवले होते. पावणेदोन लाखांचे दागिने चोरून ते पसार झाले.