पुणे जिल्हा : 231 ग्रामपंचायतींचा बिगुल

निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
खेड तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींचा समावेश
राजगुरूनगर – पुणे जिल्ह्यातील जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 अखेर मुदत संपणाऱ्या 231 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी (दि. 12) निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करुन निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, या खेड तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने महसूल यत्रंणेने तयारीला सुरुवात केली आहे. 16 जून दरम्यान प्रभागनिहाय सोडती काढण्यासाठी महसूल यत्रंणेतील तलाठी, ग्रामसेवक यांना तशा सूचना जारी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तलाठ्याच्या बदल्या झाल्या नसल्या तरी ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्यामुळे त्यातच 15 जून पासून शाळा सुरू होणार असल्याने शालेय प्रवेश, खरेदी त्यात निवडणुकीचे वारे अंगात वारे घुमु लागल्याने एकच गोंधळ उडणार आहे.
ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडती शुक्रवार (दि. 16) दरम्यान काढण्यात आल्यानंतर गुरुवारी (दि. 22) प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना शुक्रवार (दि. 23) ते शुक्रवार (दि. 30) पर्यंत दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन यावर प्रांताधिकारी अभिप्राय 6 जुलै अखेर नोंदवल्यानंतर 14 जुलैला जिल्हाधिकारी अंतिम प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी दिली.
शेतीच्या बांधावर जाऊन…
ऐन पावसाळ्यात ऑगस्ट दरम्यान ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजणार असून राजकीयष्ट्या संवेदनशील असणाऱ्या आणि लोकनियुक्त सरपंच निवडीमुळे इच्छुक मंडळींना पुन्हा एकदा शेताच्या बाधांवर जाऊन प्रचाराचे ढोल बडवावे लागणार आहे.
या 25 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडती
गोरेगाव, सुपे, कोहिनकरवाडी, वरुडे, सातकरस्थळ, पिंपळगाव तर्फे खेड, गाडकवाडी, होलेवाडी, निघोजे, सांडभोरवाडी, कोळीये, वहागाव, परसुल, देशमुखवाडी, मोरोशी, डेहणे, आडगाव, वाळद, वाघु, एकलहरे, तिफनवाडी, धुवोली, भोमाळे, संतोष नगर, वाकी बुद्रुक.
या आठवडाभरात ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडती काढण्यासाठी बोलवण्यात येणाऱ्या ग्रामसंभाच्या तारीख, वेळ येत्या एक दोन दिवसात जाहीर केल्या जातील.
– डॉ. वैशाली वाघमारे, तहसीलदार, खेड





