Pune District : केडगावच्या निबंधक कार्यालयात दलालांचे बस्तान

पाटस : केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये प्रभारी अधिकाऱ्यांच्या मूक परवानगीने प्रतिबंधात्मक अभिलेख कक्षात खासगी दलालांकडून शासकीय कागदपत्रांची उलथापालथ केली जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
दौंड येथील तहसील कार्यालयामध्ये आणि केडगाव येथील रेल्वे स्टेशनजवळ शासकीय नोंदणी कार्यालये आहेत. केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दौंड आणि बारामती तालुक्यातील अनेक गावांमधील खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी केली जाते. केडगावच्या नोंदणी कार्यालयांतर्गत अनेक गावांचा समावेश केल्याने खरेदी विक्री करणाऱ्या पक्षकारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
राज्य शासनाने नव्यानेच खरेदी विक्रीचे व्यवहार कोणत्याही नोंदणी कार्यालयात केले जाऊ शकतात, असा निर्णय घेतला आहे. साठेखत, खरेदीखत, बक्षीसपत्र, मालमत्ता घोषणापत्र, मृत्युपत्र यासह इतरही महत्त्वाच्या दस्तांची नोंदणी कार्यालयात केली जात आहे. हे दस्त कायदेशीर प्रक्रियेतून तयार झाले का, याची फारशी पडताळणी होत नाही. उपनिबंधक कार्यालयात काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी व अनधिकृत दलालांनी ठिय्या मांडला आहे. केडगावच्या नोंदणी कार्यालयांतर्गत दस्त नोंदणीतून रोज कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे व्यवहार होत आहेत. कार्यालयात खरेदी- विक्रीची नोंद करण्यासाठी अनेक कागदपत्रांची आणि नियम अटींची पूर्तता करावी लागते.
केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे.
शेतकरी व खरेदी विक्री करणाऱ्या धारकांची याठिकाणी मोठ्या प्रमाणात दलालांमार्फत आर्थिक लूट होत आहे. खासगी दलालांची नोंदणी कार्यालयात रोजची उठबस आहे. केडगाव येथे असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात दलालाशिवाय नागरिकांची कामे होत नसल्यामुळे जमीन खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
केडगाव येथील नोंदणी कार्यालयात बेकायदेशीर दस्त नोंदणीबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले आहेत. दस्त नोंदणीतील दोन्ही पक्षकारांना कार्यालयाच्या बाहेर वाट पाहत बसण्याची सूचना देऊन दलालांना खाजगीमध्ये शासकीय कार्यालयाच्या अभिलेख कक्षात घेऊन दस्त नोंदणीचे काम जोरात सुरू आहे.
केडगाव येथील नोंदणी कार्यालयाच्या कारभार पारदर्शक करण्यासाठी वरिष्ठांनी दखल घेऊन कार्यालयामध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली जात असून नोंदणी कार्यालयातील दलालांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांना कडक सूचना देऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नसल्यामुळे वरिष्ठांनी या प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सूज्ञ नागरिकांतून होऊ लागली आहे
मागील दोन दिवसांपासून नोंदणी केलेल्या दस्तांचे स्कॅन करण्याचे काम प्रलंबित असल्याने संबंधित व्यक्ती निषेध बंद जागेत प्रवेश करत आहेत. संबंधित व्यक्तींकडे नोंदणी केलेले दस्त आहेत.
-सुनील जोशी, दुय्यम निबंधक, केडगाव.
काही दिवसांपूर्वी केडगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी गेलो होतो. कार्यालयात दलालांनी मध्यस्थी केली तरच दस्त नोंदणी केली जात आहे. सर्वसामान्य लोकांना नोंदणीसाठी अनेक हेलपाटे मारावे लागत आहे. खासगी दलाल शासकीय कार्यालयातील कागदपत्रांची उलथापालथ करीत आहेत. अपंग व्यक्तींसाठी कार्यालयात कोणतीही सोय केली गेली नाही. शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्शनी भागात ओळखपत्र लावत नसल्याने दलाल आणि कर्मचारी एकाच रांगेत बसत आहेत.
-गणेश गायकवाड, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, दौंड.





