पुणे जिल्हा : दुधावर मोठे झालेले बोकेच सरकारमध्ये

मुकुंद किर्दत : पिसर्वेत उत्पादकांचे दूध संघर्ष अभियान
नायगाव – सरकारने 34 रुपये प्रति लिटरचा दूध खरेदी दर जाहीर केला; परंतु दूध संघ आणि कंपन्या यांनी हात मिळवणी करून आज दूध दर पाडण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या दूध प्रक्रिया उद्योगांच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्याची गरज आहे. दुधावर मोठे झालेले बोके सरकारमध्ये असून त्यांनीच शेतकर्याचा जोडधंदा तोट्यात आणला आहे. शेतकरी प्रश्नांवर ते संवेदनशील नाहीत, असा घणाघात आम आदमी पार्टीचे (आप) राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला.
पिसर्वे येथे दूध उत्पादक शेतकर्यांची दुधाला उत्पादन खर्चावर 15 टक्के नफा गृहीत धरून दर मिळावा. ऊसाच्या धर्तीवर दुधाला एफआरपीचे कायदेशीर कवच देण्यात यावे. दूध दर मूल्य आयोगाची स्थापना करून त्यास वैधानिक दर्जा देण्यात यावा. पशुखाद्य दरावर शासनाचे नियंत्रण असावे आदी मागणीसाठी दूध संघर्ष अभियान-आंदोलन राबविण्यात आले होते. यावेळी आपच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी किर्दत उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. अभियानास पंचक्रोशीतील उपस्थित शेतकर्यांनी समस्या मांडून सरकारी धोरणांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
शेती अभ्यासक सतीश देशमुख यांनी दुधाचे अर्थकारण समजून सांगताना येणार्या काळात कायदेशीर लढा देणार असल्याचे सांगितले. सागर जाधव यांनी तात्काळ उपाय योजना म्हणून 3.2 फॅट 8.3 एसएनएफ दुधाला 34 रुपये दर मिळावा अशी मागणी केली.
आपचे पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी शेतकर्याच्या आजच्या दयनीय आर्थिक परिस्थितीला सरकारची शेतकरी हिताच्या विरोधातील धोरण व प्रस्थापित पक्ष आणि नेते जबाबदार आहे. तसेच अधिवेशनात सरकारने बळीराजाला न्याय मिळवून द्यावा.
– दत्तात्रय कड, अध्यक्ष, आप, पुरंदर तालुका





