पुणे जिल्हा : बोगस बियाण्याने शेतकरी हतबल; अधिकारी मात्र वसुलीत मग्न

शिरूर – कंपनीने बोगस बाजरीचे बियाणे दिल्यामुळे शिरूर तालुक्यात अनेक गावांमध्ये बाजरी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पंचायत समितीचे कृषी अधिकारी मात्र दुकानदारांकडून वसुलीत मग्न असल्याची चर्चा होत आहे.
तालुक्यातील सविंदणे, कवठे, मलठण, टाकळी हाजी, फाकटे, आण्णापूर, आमदाबाद,पिंपरखेड, काठापूर, जांबुत, न्हावरे गोलेगाव, आंबळे, निमोणे, पाबळ ,जातेगाव कान्हूर मेसाई अशा अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यामुळे पेरणी केलेले बाजरी बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
यंदा जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लवकरच पेरण्या केल्या. शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी केली. मात्र, काही ठिकाणी बियाणे नित्कृष्ट दर्जाचे निघाल्याने उगवणच झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पेरणीसाठी शेतकऱ्यांनी एकरी जवळपास १० ते १५ हजार रुपयांचा खर्च केला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बियाणे देणारे डिलर, कृषी सेवा केंद्र दुकानदार, कृषी अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
शिरूर तालुक्यात खरिपाचे एकूण २७ हजार ४३३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी बाजरीची १९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेते व डिलर यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, आता शेतकरी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.
तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी एका खाजगी कंपनीच्या बाजरी बियाण्याची पेरणी केली असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. या सर्व प्रकारानंतर तालुका कृषी विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या संकटात होतेय मोठी वाढ….
शिरूर तालुक्यात विदयुत रोहीत्र, विद्युत मोटारी, केबलची चोरी, बिबट्याचे हल्ले, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट तर कधी दुबार पेरणी, या संकटामुळे शेतकरी होरपळून निघत आहे. संकटाशी मुकाबला करत शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करताना दिसत आहे.
आता शेतकरी बोगस बाजरी बियाणांमुळे उद्भवलेल्या पेरणीच्या संकटामुळे त्रस्त झाले आहेत. अगोदरच प्रचंड हालअपेष्टांनी युक्त जीवन जगणाऱ्या बळीराजाला दुबार पेरणी करावी लागणार आहे. बोगस बियाणे देऊन दुकानदार व कंपनीने शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूकच केली आहे. ज्या कृषी सेवा केंद्रातून व कंपनीकडून हे बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी पेरले त्या दुकानदार व कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हे सर्व घडत असताना पंचायत समितीचे कृषी अधिकारी काय करतात हा मोठा प्रश्न उभा राहत आहे. हे अधिकारी फक्त दुकानदारांकडून व्हिजिटच्या नावाखाली लुटत असल्याची चर्चा होत आहे. दुकानदार यामुळे पुरते वैतागले आहे.
युरीया घेताना लिकिंग खते देण्याची सक्तीबाबत ते मात्र मौन बाळगत आहे. त्यांना फक्त वसुलीचे देणे घेणे असून शेतकऱ्यांविषयी कळवळा राहीला नाही.
कृषी विभागाच्या सूचना
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्यावर बियाणे खरेदी करणाऱ्याचे नाव, पिकाचे व जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, विक्रेत्याची सही ई त्यादी नोंदी असाव्यात. कोणतेही बियाणे घेताना परवानाधारक कृषी केंद्रधारक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. बियाण्याची उगवणक्षमता, शुद्धता, चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. प्रमाणित बियाण्याच्या टॅगवर अधिकाऱ्यांची सही असल्याची खात्री करून घ्यावी. या कृषी विभागाच्या सूचना शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्यात म्हणजे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक होणार नाही. – सिद्धेश ढवळे -तालुका कृषी आधिकारी.





