Pune District : दुचाकीचोराला एक वर्ष सश्रम कारावास

लोणी काळभोर : उरुळी देवाची (ता. हवेली) येथील घरासमोर लावलेली दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी दुचाकी चोराला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्ष समश्र कारावासासह 5 हजार रुपयांच्या दंड व दंड न भरल्यास 2 महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जान्हवी भाटीया यांनी दिले आहे.
या प्रकरणी दीपक उर्फ जोजो टिंबा बाबुराव सरवदे (वय 22, रा. मांजरी खुर्द) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंबादास झाटे (वय 40, रा. उरुळी देवाची) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास झाटे हे उरुळी देवाची परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांनी त्यांची दुचाकी घराबाहेर पार्किंग केली होती. मात्र 12 मे 2024 रोजी चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी झाटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास हा हवालदार संभाजी देवीकर करत होते.
देवीकर यांनी उरुळी देवाची परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र आरोपी आढळून येत नव्हता. त्यानंतर त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता, ही चोरी ही जोजो टिंबाने केली असल्याचे तपासात निष्पन झाले. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. जोजो टिंबा हा हडपसर येथे येणार आहे अशी माहिती पोलिसांना एका खबर्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.
दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा खटला हा शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारच्या वतीने अॅड. श्रीधर जावळे यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात पोलिसांनी सादर केलेले पुरावे व अॅड. श्रीधर जावळे यांनी केलेले युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला एक वर्ष समश्र कारावास व 5 हजार रुपयांच्या दंडाची व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
प्रोत्साहनपर बक्षीस
या कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी अंमलदार लक्ष्मीबाई यादव व तपासी अंमलदार हवालदार संंभाजी देवीकर यांना 5 हजार रुपये बक्षीस मंजूर केले आहे. मागील 4 महिन्यांच्या कालावधीत लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एकूण 8 गुन्हयांत दोषसिध्दी होऊन आरोपींना शिक्षा झालेली आहे.





