पुणे जिल्हा : भोर, वेल्ह्यात उमेदवारांची तारेवरची कसरत

– काॅंग्रेसचे आपला गड राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
विंझर – भोर वेल्हे मुळशी मतदार संघामध्ये एकूण ६ उमेदवार इच्छुक असून सध्या या इच्छुक उमेदवारांमध्ये सध्या राजकीय खलबतांना उधाण आले असून भोर विधानसभा मतदारसंघाचं समीकरण कोण बदलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भोर विधानसभेचा आतापर्यंतचा निवडणुकीचा इतिहास पाहता गेले ३ दशक थोपटे कुटुंबांने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपला गड राखून ठेवला आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना याही पंचवार्षिक निवडणुकीत आपला विजय निश्चित करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यासाठी भोर विधानसभेतील महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे, महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर, अपक्ष उमेदवार किरण दगडे, कुलदीप (तात्या) कोंडे इ उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
परंतु भोर विधानसभा मतदार संघामध्ये खेडोपाड्यांमध्ये जेष्ठ वर्गापासून ते तरुणवर्गापर्यंत काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच शरद पवार यांना मानणारा वर्ग देखील सर्वाधिक वर्ग भोर विधानसभेत सर्वाधिक असल्याने तसेच संग्राम थोपटे यांनी पक्षाची पुनर्बांधणी करून कार्यकर्त्यांची मोठी फळी व ताकद पक्षामागे उभी केली आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकीची हॅटट्रिक केली.तालुक्यात केलेली विविध प्रकारची विकास कामे, रस्ते, धरण प्रकल्पबाधित गावांसाठी मोठ्या प्रमाणात आणलेला निधी,
सहकार क्षेत्रातील विविध शिखर संस्थांवर असलेली एकहाती सत्ता, सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ तसेच लोकसभा निवडणुकीत थोपटे व पवार यांच्यामधील राजकीय संघर्ष संपुष्टात आला असल्याने सुप्रिया सुळे यांना तालुक्यातून भरघोस मतदान झाले. यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शरदचंद्र पवार यांची मिळालेली खंबीर साथ, त्यातच आंबेडकरी चळवळीतून उमेदवारी अर्ज नसल्याने व भोर तालुक्यातील आंबेडकरी जनतेसाठी उभारलेल्या दिक्षाभूमिमुळे बौद्ध मतदारांचा कल ही मोठी जमेची बाजू ठरणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर, अपक्ष उमेदवार किरण दगडे, कुलदीप (तात्या) कोंडे यांना सोपी नाही. अशी नागरिकांची जोरदार चर्चा आहे.
भोर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे शंकर मांडेकर यांच्यात अटीतटीची लढत होईल,असे वाटत असले तरी महायुतीत बंडखोरी करत रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे, अपक्ष उमेदवार किरण दगडे यामुळे भोर विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत होणार आहे. मात्र, भोरमधील आमदार कोण ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
कौल कोणाला
भोर विधानसभा मतदार संघामध्ये भोर १७०२१३, वेल्हे ५४०५०,मुळशी २०६०१५ अशी तीन तालुक्यांची मिळून एकूण ४३०२७८ एवढी मतदार संख्या असून आतापर्यन्तच्या राजकीय सत्तेचा आणि विकासकामांचा विचार करता जनता कोणाला कौल देणार ? याकडे सर्व पक्षीय नेत्यांबरोबर सामान्य मतदार जनतेचे देखील लक्ष लागून राहिले आहे.





