पुणे जिल्हा : भीमाशंकर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

– अंमलबजावणी उद्यापासून ; कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती
पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लागवड हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवडीचे धोरण जाहीर झाले असून त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार असून कारखान्यामार्फत “दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२०” ही महत्त्वाकांक्षी ऊस विकास योजना राबविणेत येत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
दि. १ जून २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम.०२६५ तर दि. १ जून २०२५ ते ३० एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीमध्ये को.८६०३२ ऊस लागवडीस व नोंदीस परवानगी देण्यात आली आहे. १ ऑगस्ट २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेरपर्यंतच्या कालावधीमध्ये व्हीएसआय ०८००५ या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेरपर्यंतच्या कालावधीमध्ये एम.एस. १०००१, को. ९०५७, या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. को.व्हीएसआय १८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम. ११०८२ इ. शिफारशीत ऊस लागवडीस दि. १ जून २०२५ ते दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार दि. १ जून २०२५ पासून बेणे वाटप करण्यात येणार आहे व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पूर्तता संबंधित विभागीय शेतकी कार्यालयात जाऊन करावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसमध्ये जाऊन ऊस नोंद करावयाची आहे.
त्यानंतर उशिरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने / रोखीने राबविणेत येणाऱ्या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, ऊस बेणे वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएसआय उत्पादित मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमिक अॅसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशके बी.व्ही.एम., इ.पी.एन. इ. निविष्ठांचा पुरवठा, हंगामवार ऊस पीक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा. ऊस पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेणेस इच्छुक शेतकऱ्यांनी प्रवेश शुल्क रक्कम रु.१००/- डिसेंबर २०२५ अखेर भरणा करून स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी.
हुमणीचे नियंत्रण करावे…
एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे जून २०२५ अखेर खरेदी केले जाणार असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण करावे.ऊस विकास योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील यांनी केले आहे.





