Pune District: बेलसरच्या अवलियाचा पुणे ते प्रयागराज सायकल प्रवास

बेलसर : पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील सुपुत्र अजिंक्यराजे सुनील जगताप यांनी पुणे ते प्रयागराज असा 1571 किलोमीटरचा प्रवास साधारणपणे प्रति दिवस 224 या प्रमाणे अवघ्या सात दिवसांमध्ये पूर्ण केला. ही कामगिरी पूर्ण करून नुकतेच त्याचे बेलसर येथे आगमन झाले. त्याने प्रयागराज येथील कुंभमेळा, हरिद्वार, महाकाल परिक्रमा पूर्ण केल्याने ग्रामस्थांच्या वतीने पारंपारिक वाद्याच्या गजरात त्याचे वाजत गाजत जंगी मिरवणुकीने स्वागत करण्यात आले.
अजिंक्यने अवघ्या एक वर्षांपूर्वीच सायकलचा प्रवास करण्याचा निर्धार केला होता. डिसेंबर 2023 मध्ये त्याने सायकल खरेदी केली व एक वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 8000 किलोमीटर प्रवास त्याने सायकल वर केला. यामध्ये पुणे पंढरपूर 27 तासांत 516 किलोमीटर असा लांब पल्ल्याचा प्रवास त्यांनी केला तर तो हडपसर येथे राहत असून तेथून कोथरूड येथे ऑफिसमध्ये नियमित 33 किलोमीटर ये-जा करतो तर दर शनिवारी गावी बेलसर येथेही सायकलनेच येतो त्यामुळे त्याने मोठ्या आत्मविश्वासाने ही मोहीम पूर्ण केली.
राहण्यासाठी टेन्ट आणि झोपण्यासाठी स्लीपिंग बॅग ,थोडे कपडे, सोबतच पाण्याच्या बाटल्या आणि आईने बनवलेले शेंगदाण्याचे लाडू घेऊन, त्याने सोमवारी (दि. 3) रात्री 12 वाजता प्रवासाला सुरुवात केली. उन्हापासून वाचण्यासाठी त्याने संपूर्ण प्रवास रात्रीचा केला.
परतीचा प्रवासात अडचणी
सायकल खराब झाली असल्यामुळे सायकल चालवण्यात खूप अडथळा येत असल्याने इच्छा असतानाही परतीचा प्रवास सायकलवर करता न आल्याची खंत त्याने व्यक्त केली व टेम्पो, गॅसचा ट्रक, लॉरी, स्लीपर कोच बस, आणि मध्य प्रदेश परिवहन बस यांच्यावर सायकल ठेवून तो पुन्हा पुणे येथे सुखरूप पोहोचला. पुण्यामध्ये सायकल दुरुस्त करून तो त्याच्या गावी बेलसर येथे सायकल वरती आला येथे झालेल्या स्वागताने तो भारावून गेला.





