Pune District : किल्ले शिवनेरीवर मधमाशांचा शिवभक्तांवर हल्ला
Updated On:

लेण्याद्री : किल्ले शिवनेरीवरील शिवजन्माचा मुख्य सोहळा मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडल्यानंतर सकाळी 11 च्या सुमारास हत्ती तलाव- कडेलोट परिसरात असलेल्या पोळ्यावरील माशा उडाल्या आणि शिवभक्तांची पळापळ झाली.
या दुर्घटनेत 10 ते 12 पर्यटक किरकोळ जखमी झाले असून त्यांना गडावरील आरोग्य पथके, जुन्नर रेस्क्यू टीम तसेच 108 रुग्णवाहिकेचे कर्मचारी यांनी तातडीने प्रथमोपचार व मदतकार्य केले.
दरम्यान गडावर शिवजयंती दिनी मोठ्या संख्येने शिवभक्त येत असतात. यावेळी वाढलेली गर्दी, स्पिकरचे आवाज, हेलिकॉप्टरचा आवाज आदी कारणांमुळे माशा विचलित झाल्या असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोहळा सुरू असताना माशा उडाल्या असत्या तर फार गोंधळ उडाला असता. दरम्यान जखमींना पुढील उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.





