Pune District : अवसरी ते कल्याण एसटी बससेवा पूर्ववत

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सुरू असलेली अवसरी ते कल्याण ही एसटी बस गेली दोन महिने बंद होती. त्यामुळे अवसरी आणि परिसरातील गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांचे, कामगार यांचे मोठे हाल होत होते. त्यामुळे अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक ग्रामपंचायत तिने मुरबाड आगाराला पत्रव्यवहार व पाठपुरावा केल्यानंतर मुरबाड आगाराने शनिवारी अवसरी ते कल्याण ही एसटी बस पूर्ववत चालू केल्याने नारायणगाव, आळेफाटा, ओतूर, मुरबाड, कल्याण या मार्गे दररोज ये-जा करणाऱ्या कामगार, प्रवासी व विद्यार्थ्यांची सोय झाल्याने प्रवाशांनी मुरबाड आगर प्रमुखाचे आभार मानले आहेत.
मुरबाड आगाराने गेल्या ३४ वर्षांपूर्वी कल्याण ते अवसरी ही एसटी बस मुक्कामी चालू केली होती.आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, गावडेवाडी, मेंगडेवाडी या सह परिसरातील गावातील प्रवाशांची चांगली सोय झाली होती. अवसरी कल्याण एसटी बस ३४ वर्षात सतत फायद्यात चालत होती. परंतु दोन महिन्यापूर्वी कोणतेही कारण न देता एसटी बस बंद केली. त्या मुळे या भागातील प्रवासी व विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
अवसरी खुर्दचे सरपंच वैभव वायाळ, अवसरी बुद्रुकचे सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे पाटील यांनी ठाणा डिव्हिजन प्रमुख धनंजय शिंदे यांच्याशी पत्र व्यवहार केल्यानंतर शिंदे यांनी तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी कल्याण अवसरी एसटी बस विठ्ठलवाडीवरून सकाळी सहा वाजता चालू केली होती. मात्र, प्रवासी मोठ्या प्रमाणात मिळत नसल्याने ही एसटी बस तोट्यात चालत होती व प्रवाशांच्या फायद्याची नसल्याने मुरबाड एसटी आगाराने प्रवासी व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शनिवारपासून कल्याण ते अवसरी ही मुक्कामी एसटी बस पूर्ववत चालू केल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
चाकरमान्यांनाही फायदा
कल्याण ते अवसरी एसटी बस कल्याणवरून दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटून रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी मुक्कामी पोहोचणार व दुसऱ्या दिवशी ६ वाजून ३० मिनिटांनी अवसरी येथून निघून सकाळी ११ वाजेपर्यंत कल्याणला पोहोचणार असल्याचे या एसटी बसच्या असल्याने या एसटी बसचा फायदा व्यापारी नोकरदार वर्गाला सुद्धा होणार आहे.





