Pune District : कचर्यासंदर्भात जनजागृती; रॅलीद्वारे ‘स्वच्छ वाघोली’चा संदेश

वाघोली – वाघोलीतील गणेश नगर परिसरात ‘स्वच्छ वाघोली, हरित वाघोली’ या संकल्पनेतून एक प्रभावी कचरा जनजागृती रॅली नुकतीच भाजपा युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांच्या पुढाकाराने उत्साहात पार पडली.
परिसरातील नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आणि स्वच्छ वाघोली या मोहिमेला बळकटी दिली. या रॅलीचे प्रमुख उद्दिष्ट परिसरात स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करणे, रस्त्यावर कचरा टाकणे टाळणे, कचर्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे तसेच कचरा थेट मनपाच्या घंटागाडीत टाकणे हे होते.
‘आपला परिसर स्वच्छ ठेवूया, रोगराई टाळूया!’ असा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत एक सकारात्मक सामाजिक संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे वाघोलीतील स्वच्छता मोहिमेला नवी ऊर्जा मिळाली आहे.
‘स्वच्छ वाघोली’ ही केवळ जनजागृती मोहीम नसून नागरिकांच्या सहभागातून घडणारी एक सामाजिक चळवळ आहे. अशाच जनहिताच्या उपक्रमांमधून सकारात्मक बदल घडतो असतो. रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.
-संदीप सातव, जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा पुणे





