सासवड – येथील साक्षी संदीप जगताप यांच्या घरी यंदाच्या गौरी-गणपती सजावटीत सासवडच्या पांडवकालीन सिद्धेश्वर महादेव मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून, हा देखावा गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून स्टेज उभारणीपासून ते मंदिराची रचना तयार करण्याचे काम सुरू होते. शिवलिंग व नंदीची प्रतिकृती शाडू मातीपासून विनायक जगताप यांनी साकारली आहे. गौराईची उभी प्रतिमा मांडण्यात आली असून, गणपतीच्या पार्श्वभूमीला सुवर्णप्रभावळ बसवण्यात आलेली आहे. देखाव्यासमोर सिद्धेश्वर महादेवांची महाकाल स्वरूपात पूजा मांडलेली आहे. संपूर्ण सजावट नैसर्गिक स्वरूपात करण्यात आली आहे. वृक्षलागवडीचा संदेश देत माजी वसुंधरा अभियान अंतर्गत झाडे लावा, झाडे जगवा तसेच पाणी आडवा, पाणी जिरवा ही थीम मांडण्यात आली आहे. तसेच या उपक्रमाला सासवड नगर परिषदेच्या स्वच्छ सासवड, सुंदर सासवड अभियानाशी जोडण्यात आले आहे. या देखाव्याच्या संकल्पना संदीप अशोकराव जगताप यांनी मांडल्या असून, संपूर्ण सजावट घडवून आणण्यात जगताप कुटुंबीय – साक्षी जगताप, सिद्धी जगताप, विनायक जगताप, तसेच विक्रांत शिंदे, निलम शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे. हा आकर्षक देखावा गणेशभक्तांसाठी अनंत चतुर्दशीपर्यंत दर्शनासाठी खुला ठेवण्यात आला आहे.