पुणे जिल्हा : विधानसभा इच्छुकाचा मोफत प्रवास पडला महागात

आढे गावाजवळ बस उलटली : 21 जण जखमी
राजगुरूनगर – मोफत पंढरपूर यात्रा करून परतलेल्या बसला खेड तालुक्यात अपघात होऊन 21 जण जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विधानसभा निवडणूक लढविणार्या इच्छुक उमेदवाराने आयोजित केलेल्या दर्शन गाडीला हा अपघात झाला आहे. अपघातातील 21 जणांवर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
खेड तालुक्याच्या आढे गावाजवळ सोमवारी (दि. 1) पहाटे हा अपघात झाला. पंढरपूर दर्शन करून यात्रेकरूंना गावोगावी सुखरूप परत घरी सोडण्यासाठी बस आली होती. त्यावेळी तांबडे वाडी परिसरात पाऊस पडत होता. आढे गावाजवळ आल्यावर रस्त्याच्या कडेला चिखलात घसरून खड्यात चाक उतरल्याने बस उलतली. त्यातील 20 ते 25 भाविक आतमध्ये सीटवर तसेच एकमेकांवर आदळले.
खेड तालुक्यात विधानसभा निवडणुकीची इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काही महिन्यात होणार्या निवडणुकी पुर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांकडून विविध प्रकारची प्रलोभने दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आषाढी वारी सुरू असताना पंढरपूर दर्शनाचा लाभ मतदारांना देण्याचा आटापिटा इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. मात्र पावसाळा आणि घाईगर्दीच्या या पार्श्वभूमीवर मोफत प्रवास नागरिकांच्या जिवावर कसा बेतु शकतो? राजकीय स्पर्धा कोणत्या टोकाला पोहोचली आहे, याचा हा एक नमुना समोर आला आहे.
सामाजिक प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज
खेड तालुक्यात अनेक गावांमध्ये अनेक प्रश्न आहेत यात अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, त्यात शिकणार्या मुलांचे अनेक प्रश्न भौतिक सुविधा असे प्रश्न प्रलंबित आहेत. पश्चिम भागातील अनेक शाळांतील गरीब कुटुंबातील मुलांना कपडे शालेय साहित्य, भौतिक सुविधा नाहीत. तालुक्यातील इच्छुक नेते केवळ राजकारण करण्यासाठी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत मतदारांना मात्र देवदर्शनाला नेत खर्च करीत आहेत. यासाठी खेड तालुक्यात इच्छुक उमेदवारांची मोठी स्पर्धा लागली आहे. ते जरी वैकतिक खर्च करीत असले तरी त्यांनी सामाजिक प्रश्नाकडे लक्ष देत ते सोडविण्यासाठी खर्च करणे अपेक्षित आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.





