पुणे जिल्हा : आर्यन, उदय, ऋतुजा महाराष्ट्र संघात

राजगुरूनगरातील गांधी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
राजगुरूनगर – येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू आर्यन नितीन वरकड, उदय रामदास रेटवडे व ऋतुजा विजय राक्षे यांची अनुकमे 17 व 19 वयोगटात बेसबॉल व तायक्वांदो या खेळात महाराष्ट्रच्या संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे महात्मा गांधी विद्यालयाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती व शिवछत्रपती क्रीडा नगरी म्हाळुंगे बालेवाडी पुणे आयोजित राज्यस्तर शालेय बेसबॉल व तायक्वांदो स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयच्या खेळाडूंनी हे घवघवीत यश प्राप्त केले आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयातील तनुजा राक्षे (तायक्वादो), श्वेता तनपुरे (वेटलिफ्टिंग), अर्जुन गावडे (तायक्वादो), आर्यन वरकड (वेटलिफ्टिंग), समृद्धी बेंडूरे (तलवारबाजी) यांनी यश मिळवले. दिल्ली, मध्यप्रदेश ,नांदेड या ठिकाणी होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या संघाचे प्रतिनिधीतत्व हे खेळाडू करणार आहेत.
या खेळाडूंना महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविदयालयच्या प्राचार्या संध्या कांबळे व सर्व अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, सचिव गणेश जोशी, सर्व संचालक मंडळ यांनी खेळाडू व क्रीडाशिक्षक यांचे अभिनंदन केले.





