पुणे जिल्हा : महावितरणच्या अनिल घोबाळे यांच्या धाडसी कामाचे होतेय कौतुक

रात्री अपरात्री खंडित झालेला वीजपुरवठा करतायेत सुरळीत
शिरुर : टाकळी हाजी (ता.शिरूर) परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. मात्र महावितरणचे कर्मचारी अनिल घोबाळे कर्तव्य तत्परता दाखवून तमा न बाळगता मध्यरात्री ग्रामस्थांच्या आग्रहाखातर विद्युत खांबावर चढून खांबांवर असणाऱ्या काही झाडाच्या , वेलींच्या फांद्या तोडून अडचणीतून मार्ग काढून वीज पुरवठा तातडीने पूर्ववत केला. त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल बेट परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यापुर्वी टाकळी हाजी येथे घोबाळे हे कार्यरत होते .त्यांची बदली शिरूर येथे झाली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी या परीसरात चांगल्या प्रकारचे काम केले होते. त्यामुळे त्यांची बदली झाल्यानंतरही त्यांना परत टाकळी हाजी येथे आणण्यासाठी शिरूर येथील अधिकाऱ्यांना विनवणी केली जात होती.
अनेक दिवसांपासून टाकळी हाजी येथे महावितरण कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने नागरिकांनी अनेकदा आवाज उठविला होता. काही अडचण आल्यास वीजपुरवठा पूर्ववत होण्यास विलंब लागत होता. याठिकाणी पूर्वीचा अनुभव असलेले घोबाळे हे पुनश्च येथे कर्तव्यास आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
टाकळीहाजी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून अनेकदा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. अशा परीस्थितीतही नागरीकांनी फोन केल्यास रात्री अपरात्रीही कामाप्रती तप्तर असणाऱ्या घोबाळे यांच्या कामाचे परीसरात विशेष कौतुक होत आहे.





