पुणे जिल्हा : मोटारसायकलींसह जबरी चोरी करणारी टोळी आळेफाटा पोलिसांकडून जेरबंद

45 मोटारसायकल सह 4 आरोपी जेरबंद ; 23 लाखांचा मुद्देमाल जप्त
आळेफाटा : आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत गुंजाळवाडी येथे 29 मे रोजी शांताबाई बबन पावडे यांना एका अनोळखी व्यक्तीने धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र ओढून जबरी चोरी केलेबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने प्रमोद क्षीरसागर यांनी पथक तयार करून आरोपीचा शोध घेणेबाबत तपास सुरू केला.त्यानुसार पथकाने राजुरी,गुंजाळवाडी, बेल्हे या भागात सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे अनोळखी व्यक्ती निघोज येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने संशयित व्यक्ती प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे वय 26 वर्ष रा निघोज यास ताब्यात घेऊन आळेफाटा पोलीस स्टेशन येथे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले व त्याचे इतर साथीदार यांच्यासोबत त्याने 45 मोटरसायकल चोरी गेल्या असल्याचे सांगितले.
त्यानुसार त्याचे साथीदार ज्ञानेश्वर रंगनाथ बिडवे वय 22 वर्ष, गणेश फक्कड कारखिले वय 23 वर्ष दोघे राहणार निघोज आदिल मुक्तार अहमद कुरेशी वय 30 वर्ष रा निघोज यांच्या मदतीने मोटरसायकल चोऱ्या केल्या बाबत निष्पन्न झाल्याने वरील सर्व आरोपींना निघोज येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी आळेफाटा, नारायणगाव,ओतूर,शिरूर, रांजणगाव,शिक्रापूर,पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, हिंगोली, औरंगाबाद,नाशिक या भागातून मोटरसायकल चोरी केली बाबत सांगितल्याने त्यांना अटक करून वाहन चोरीबाबत तपास केला असता 45 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
त्यापैकी आतापर्यंत 34 वाहनांचे वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याबाबत तपासात निष्पन्न झाले असून उर्वरित वाहनांचे मालकांचा शोध घेऊन अधिक तपास सुरू आहे.आरोपी इतर कोणत्या गुन्ह्यात याबाबत चौकशी सुरू असून आरोपीकडून तेवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये जबरी चोरीतील सोने व एकूण 45 वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय शिंगाडे पुढील तपास करीत आहे.





