Pune District: पोंदेवाडीला पाणी पुरवणारे चारही तलाव तुडुंब

लाखणगाव : पोंदेवाडी (ता.आंबेगाव) गावाला वरदान ठरणारे चारही तलाव तुडुंब भरले असल्याने येथील पिण्याचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. हजारो एकरातील शेती पिकांना तलावातील पाणी साठ्याचा फायदा होणार आहे.
पोंदेवाडी गावात महत्त्वाचे व मोठे चार तलाव आहेत.यामध्ये सटवाजीबाबा पाझर तलाव, स्मशानभूमी येथील पाझर तलाव,खारावस्ती येथील पाझर तलाव व राजोबा पाझर तलाव असे चारही पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे या परिसरातील संबंधित शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
तलाव भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील पंधरा दिवस सुरू असलेला पाऊस हा फायदेशीर ठरणार असून सटवाजीबाबा पाझर तलाव भरल्याने शेतीला फायदा होणार असल्याचे शेतकरी शरद रोडे व सुभाष रोडे यांनी सांगितले.
तर खारावस्ती व राजोबा पाझर तलावामुळे शेतीला व स्मशानभूमी येथील पाझर तलावामुळे गावाला पाणी पुरवठा होणार असून गावातील पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले. पोंदेवाडी गाव हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे उजव्या कालव्यामुळे ओलीताखाली आले आहे.
गावात असणाऱ्या पाझर तलावांमुळे पाणीसाठा होवून येथे बागायती शेती केली जाते.हेच तलाव भरून वाहू लागले असल्याने येथील शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी पुढच्या कालखंडामध्ये या तलावाचा फायदा होणार आहे. पूर्वी अनेक गावांमध्ये तलाव होते. यातले काही सरकारी तर काही खाजगी जागेत होते.खाजगी मालकीत असल्याने शेतकऱ्यांनी हे तलाव सपाट करून शेती तयार केली.
तलावातील पाणी चांगले…
परंतु पोंदेवाडी येथे मात्र हे तलाव आजही चांगले ठेवले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साठते. त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी साठवण्यासाठी असणारे तलावांची निगा राखणे गरजेचे आहे.





