Pune District : पळसदेव भागात एअरटेलची सेवा ठप्प

पळसदेव – पळसदेव भागातील माळेवाडी, शेलारपट्टा, पळसदेव भागात सध्या एअरटेलची सेवा मिळत नसल्याने नागरिक पुरते वैतागून गेले आहेत. या भागात सतत मोबाईलला रेंज नसणे, फोन न लागणे, इंटरनेट व्यवस्थित न चालणे या समस्यांनी नागरिक पुरते वैतागून गेले आहेत. त्यामुळे तातडीने पळसदेव भागात एरटेल ची सेवा तातडीने सुरळीत करण्याची मागणी ग्राहकाकडून होत आहे.
पळसदेव परिसरातील विशेतः माळेवाडी, पळसदेव, शेलारपट्टा भागात नागरिकांचे फोन लागत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकमेकांशी संपर्कच होत नसल्याने नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत आहे. एअरटेल कंपनीने रिचार्जचे दर भरमसाठ वाढवले आहेत.
दर वाढवून देखील नागरिकांना सेवा मिळत नसल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. एअरटेल कंपनी नागरिकांकडून रिचार्जच्या नावाखाली पैसे वसूल करून सेवा देत नसल्याने नागरिकांची मोठी फसवणूक होत आहे.
तरी पळसदेव भागात खंडित झालेली एअरटेलची सेवा तातडीने सुरळीत करावी व जेवढे दिवस सेवा दिली नाही तेवढे दिवस रिचार्ज मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.





