Pune District : श्री छत्रपतीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज

बारामती : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीची प्रशासनाने तयारी केली आहे. मतदानाच्या तयारीसाठी दुपारी सर्व पथके मतदान केंद्रांवर पोहोचली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
मतदानासाठी एकूण ७६ मतदान केंद्र आहेत. रविवारी (दि.१८) सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान होणार आहे. मतदारांनी मतदानाला येताना निवडणुक ओळखपत्र, आधारकार्ड, ड्रायव्हींग लायसन, पॅनकार्ड, फोटो असलेले बॅंक पासबुक पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी आणावा.
मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी १० झोनल ऑफीसर यांचे पथक नेमण्यात आले आहे. पथकासमवेत एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस काॅन्स्टेबल यांचा समावेश आहे. सहायक निबंधक प्रमोद दुर्गुडे यांनी सांगितले की, एकूण ७६ मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
प्रत्येक केंद्रांवर १ केंद्र अध्यक्ष, ५ मतदान अधिकारी, २ कर्मचाऱ्यासह आठ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण २०० मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांची प्रक्रियेसाठी नियुक्ती केली आहे. अ वर्गासाठी २२ हजार ७८२ ऊउत्पादक सभासदांसह ३२४ मतदार ‘ब’ वर्गासाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सोमवारी (दि १९) शहरातील अभियांत्रिकी भवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी एकूण २०० पोलीस अधिकारी यांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, यात १ उपविभागीय पोलीस अधिकारी, २५ अधिकारी आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.





