पुणे जिल्हा : निवडणूक कामकाजाचे चित्रीकरण प्रसारित केल्यास कारवाई

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
भोर – भोर विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमिशनींगच्या निवडणूक कामकाजाचे चित्रीकरण करुन प्रसारित केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला.
दोन उमेदवारांच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करुन पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घेता जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली, असेही डॉ. खरात यांनी कळविले आहे.
डॉ. सुहास दिवसे म्हणाले की, ईव्हीएम कमिशनींग, मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र आदी ठिकाणी निवडणूक प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यादरम्यान निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, मतदान प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी, मतदार, वार्ताहर आदी कोणाही व्यक्तीला कोणताही मोबाइल, स्मार्टवॉच,
इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णत: बंदी आहे. निवडणूक कामकाजाचे व्हिडीओ तसेच छायाचित्रे काढून विविध व्हॉटस्ॲप ग्रुप, सोशल मीडियावर प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.





